3.6 C
New York

Uddhav Thackeray : ठाकरेंची दिल्लीवारी सोनिया दर्शनासाठी, दरेकरांचे टिकास्त्र

Published:

मुंबई

उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आजपासून तीन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्यावर भाजपा (BJP) गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी टिकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरेंची दिल्लीवारी ही सोनिया (Sonia Gandhi) दर्शनासाठी असल्याची खरमरीत टीका दरेकरांनी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

दरेकर म्हणाले की, श्रावणात आपण देवदर्शन करतो. परंतु उद्धव ठाकरे दिल्लीत सोनिया दर्शन करायला गेले असावेत. एकीकडे दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा, अशा प्रकारची राणाभीमदेवी थाटात गर्जना करायची. दुसऱ्याला दिल्लीश्वरांच्या पायाशी गेले म्हणून टोमणे मारायचे. आता उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीश्वरांच्या खेटा मारणार आहात त्याबाबत महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला काय सांगणार आहात, असा सवालही दरेकरांनी केला.

दरेकर म्हणाले की, जरांगे यांनी पाठबळ मिळविण्यासाठी मराठा समाजाच्या भावना एकत्रित केल्या. भोळ्या भाबड्या मराठा समाजाचे समर्थन मिळवले. त्यांच्या पोटात जी राजकीय महत्वकांक्षा ती आता बाहेर येताना दिसतेय. मराठा समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न जरांगे पाटील यांनी करू नये, अशी विनंतीही दरेकरांनी केली. तसेच मराठा समाज कुठल्या नेतृत्वावर विश्वास टाकत नाही. कारण अनेक आंदोलने झाली, अनेक नेते झाले. लाखोंचे मूकमोर्चे झाले. कुठलाही नेता त्या आंदोलनात नव्हता म्हणून ते आंदोलन यशस्वी झाले. मराठा समाजाने जरांगे यांच्यावर विश्वास टाकला होता. त्या विश्वासाला ठेच पोचवण्याचे काम करू नये. कारण गेले महिनाभर ते ना मराठ्यांच्या प्रश्नांवर बोलत, ना मराठा आरक्षणाबाबत भुमिका मांडत, ना सर्व पक्षांना एकत्रित येण्याबाबत बोलत. केवळ विधानसभेपर्यंत हा प्रश्न धगधगत ठेवायचा आणि त्या धगधगत्या तव्यावर आपली राजकीय पोळी भाजायची असा उद्देश जरांगेंचा असल्याचे मराठा समाजाला स्पष्ट झालेय. त्यामुळे मराठा समाजात अस्वस्थता निर्माण झाल्याचे दरेकरांनी म्हटले.

दरेकर म्हणाले की, तसेच जरांगे जवळपास अर्धे राजकारणी झालेत. त्यांच्या आंदोलनाची सुरुवात ज्या दिवसापासून झाली तेव्हापासूनच्या गोष्टींचे आकलन केलात तर कसा राजकीय वास होता हे दिसून येईल. फक्त मराठा समाजाचे कवच घेऊन त्यामागे राजकीय भुमिका निभावत होतात ते आता अंतिम टप्प्यावर आल्याचे दरेकरांनी म्हटले. त्याचबरोबर आरक्षणाचा मुद्दा समजून न घेता त्याचा बांगलादेशमधील हिंसेशी संदर्भ जोडणे म्हणजे आपल्याला महाराष्ट्रात अराजकता निर्माण व्हावी असे वाटतेय त्याला पूरक अशा प्रकारचे वक्तव्य ठरतेय की काय अशा प्रकारची आम्हाला भीती वाटत असल्याचेही दरेकर म्हणाले.

दरेकर म्हणाले की, अडसूळ हे काही पक्षप्रमुख नाहीत किंवा निर्णय घेणारे नाहीत. ते मागणी करू शकतात परंतु अंतिमता जागा वाटप हे त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आणि तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकत्रितपणे होईल जागा वाटपासंदर्भात कुठेही वादविवाद होणार नाहीत. समंज्यसपणे महायुतीत जागा वाटप होईल.

दरेकर म्हणाले की, मराठा समाजासाठी अनेक संघटना काम करताहेत. त्याचप्रमाणे केरे-पाटील हेही मराठी क्रांती ठोक मोर्चाच्या माध्यमातून अनेक वर्ष आंदोलनं करताहेत. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले होते, ते टिकलेही होते. त्याचबरोबर सारथी, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ माध्यमातून मदत झाली. असे असतानाही फडणवीसांच्या बंगल्यावर केरे-पाटील यांनी मोर्चा आणणे याचे गणित कळले नाही. एक बरे झाले फडणवीस किंवा आम्ही काही लोकांना चालवतोय असा जो भ्रम होता तो केरे-पाटलांच्या फडणवीसांच्या बंगल्यावरील आंदोलनामुळे दूर होईल, समाजासाठी सगळे काम करताहेत ही भावना वाढीस लागून समाजाचे हित जपले जाईल, अशी अपेक्षा असल्याचेही दरेकरांनी म्हटले.

दरेकर म्हणाले की, संजय राऊत आतापर्यंत पोपट आहेत असे आम्हाला वाटत होते. परंतु त्यांचा हल्ला हा कावळ्याचा हल्ला असल्याचे ते स्वतः सांगताहेत त्यामुळे त्यांची नवी ओळख कावळा ही महाराष्ट्रातील जनतेसमोर आलीय. नेमके अनेक कावळे कोण? ते स्वतः कावळे असल्याचे म्हणालेत. त्यांच्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे इतर प्रवक्ते आहेत तेही कावळे असल्याचे राऊत यांनी दाखवून दिलेय. कावळ्याच्या चोचा मारणे यापलीकडे आम्ही यांच्या हल्ल्यांना जुमानत नाही. संजय राऊत रोज कावकाव करतच राहतील, असा टोलाही दरेकरांनी लगावला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img