मीरारोड
महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षाची कारकीर्द पाहिली आहे. मीरा-भाईंदर देवेंद्र फडणवीसांची कारकीर्द विसरू शकत नाही एवढा निधी त्यांनी मीरा-भाईंदरसाठी दिला आहे. मीरा-भाईंदरच्या विकासात देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. मीरा-भाईंदरचे चित्र बदलले त्याचे खरे शिल्पकार फडणवीसच आहेत, असे प्रतिपादन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी भाजपा मीरा-भाईंदर शहर जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीत केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले की, मीरा-भाईंदर मला नवीन नाही. मागे मेळाव्याला आलो त्यावेळी तणावपूर्ण वातावरण होते. आता तो तणाव निवळल्याचे चित्र आहे. हा भाजपाच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे. भाषणापुरते नको व्यासपीठावरील आणि व्यासपीठाखालील सर्वांनी भाजपाचा झेंडा पूर्ण ताकदीनीशी फडकविण्यासाठी काम करण्याची शपथ घेण्याची गरज आहे. मी तुम्हाला वचन देतो ‘मीरा-भाईंदर पे करेगा अंमल, वह केवल भाजपा का कमल’, कमळ हाच आपला पक्ष, कमळ हिच आपली निशाणी असल्याचेही दरेकरांनी यावेळी म्हटले.
दरेकर पुढे म्हणाले की, नेत्यांनी कार्यकर्त्यांना कधीच कमी लेखू नये. कार्यकर्ता हिच आपली ताकद आहे. जे कार्यकर्त्यांना मानत नाहीत, पारखू शकत नाहीत ते यशस्वी होत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याची जबाबदारी व्यासपीठावरील नेत्यांची आहे. मीरा-भाईंदरमध्ये कार्यकर्त्यांची चांगली फळी आहे. चांगल्या फळीला चांगल्या प्रकारे कामात गुंतवण्याची गरज आहे. जेव्हा आमचे नेते भाषणं करताना आम्ही ऐकतो त्यातून आम्ही काय घेतो? मी पंतप्रधान मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचे भाषणं ऐकतो व त्यातून मला काय घ्यायचे आहे याचा विचार करतो. पुण्यात बैठकीत फडणवीसांचे भाषण झाले. त्यात २ टक्के व्होट वाढले असते तर महाराष्ट्रात चित्र वेगळे असते असे ते म्हणाले. आजही महाराष्ट्रात २ टक्के व्होट वाढविण्याचे काम भाजपाचे कार्यकर्ते करतील तर महायुतीचे २०० आमदार नक्कीच निवडून येतील, असा विश्वासही दरेकरांनी यावेळी व्यक्त केला.
दरेकर पूढे म्हणाले की, आपल्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. १५०० रुपये सरकार देणार आहे. केवढा मोठा हा निर्णय आहे. मात्र विरोधक म्हणतात पैसे कुठून आणणार. विरोधकांनी याची चिंता करू नये. निवडणुकीनंतर सरकार आमचेच येणार आहे. विरोधकांना खोटे बोलण्याशिवाय काहीच कामधंदे नाहीत. संविधान बदलणार म्हणून ४०० पार हवेत असे खोटे पसरवले. त्याचा परिणाम झाला ना? संविधानाचा सर्वात मोठा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी जे-जे करायचेय ते आपल्या सरकारने केलेय. बाकी कुठल्याच सरकारने केले नसल्याचेही दरेकरांनी ठासून सांगितले.
दरेकर म्हणाले की, येणाऱ्या नव्या पिढीला पुढे आणायचे आहे. युवा हे उद्याचे पक्षाचे, देशाचे, निवडणुकीचे भविष्य आहे. आपल्यानंतर उद्याची पिढी घडवली नाही तर भाजपाचा विजयरथ पुढे नेण्यासाठी सशक्त टीम होणार नाही. आपल्या पक्षाचे भाग्य आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे नेतृत्व आपल्याकडे आहे जे विद्यार्थी, तरुणांशी संवाद साधतात. त्यामुळे त्यांचा मोदींवर, पक्षावर विश्वास आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्याची गरज असून ती मोहीम घेण्याचा संकल्प होणे आवश्यक आहे.
दरेकर म्हणाले की, फेक नॅरेटिव्ह नवीन जमात पैदा झालीय. खोटं बोलायचे पण रेटून बोलायचे ही नीती विरोधकांची आहे. विरोधकांकडे सांगायला काही नाही. आमच्याकडे १० वर्षात पंतप्रधान मोदींनी देशाला प्रगतीकडे नेलेय. जगात देशाला नावलौकिक मिळवून दिलाय. ती पुंजी, भांडवल आपल्याकडे आहे.
दरेकर म्हणाले की, आपण अडीच वर्षाचे सरकार पाहिले. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन ‘आपले सरकार’ बनवले. आपल्या अडीच वर्षाच्या सरकारच्या काळात कधी नव्हे एवढा महाराष्ट्राचा विकास झाला. एवढे करूनही विरोधकांना मतदान कुठून होते. याचा अर्थ आपण कुठेतरी संशोधन करण्याची गरज आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपला विजय झालाय. जरी आपला विजय झाला असेल तरी आपले खासदार कमी झाले. हे शल्य मनात आहे. थोडे मतदान वाढवले असते तर नामुष्की आली नसती. देश नाचतोय त्याप्रमाणे महाराष्ट्रही नाचला असता हे शल्य कार्यकर्त्याच्या मनात आहे. पण चिंता करण्याची गरज नाही आपले नेतृत्व सक्षम आहे. पंतप्रधान मोदींना वाईट वाटले नसेल का? मात्र ते बसून राहिले नाहीत. पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर कामाला लागले. देशाला मला पुढे घेऊन जायचेय या जाणीवेतून त्यांनी काम सुरू केले. देवेंद्र फडणवीस यांनीही निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. असे आपले नेतृत्व आहे.
दरेकर म्हणाले की, मी मराठा समाजाचा असून मराठा आरक्षणावर बोलतो. ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले जे हायकोर्टात टिकले, सुप्रीम कोर्टाने नाकारले नाही त्या आमच्या नेतृत्वावर देवेंद्र फडणवीसांवर बोलणार तर आम्ही सहन करणार नाही. मराठा आरक्षण आपण दिले, १० टक्के आरक्षण दिले, समाजासाठी जे-जे करायचे आहे ते आपणच करणार आहोत. आरक्षण महत्वाचे आहे. काही जण बोलतात आरक्षण कशाला हवे. जो गरीब, मागास समाज आहे त्याला आरक्षणाची गरज आहेच, आरक्षणाने तो आर्थिक दृष्ट्या सक्षम बनेल त्यानंतर तो आरक्षणाचा हळूहळू लाभ घेणार नाही. मात्र त्यांना समाजाच्या मोठ्या स्तरावर आणण्यासाठी आरक्षणाची गरज असल्याचा पुनःरूच्चारही दरेकरांनी यावेळी केला.
मीरा-भाईंदर शहर जिल्ह्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विस्तारित कार्यकारिणी बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर छायाचित्रात दिसत आहेत. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार नरेंद्र मेहता, जिल्ह्याचे प्रभारी जयप्रकाश ठाकूर, विधानसभा प्रमुख रवी व्यास, जिल्हा अध्यक्ष किशोर शर्मा, महिला अध्यक्षा अनिता पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष पंकज पांडे, वनिता बने, ध्रुवकिशोर पाटील, अभिजीत पेडणेकर, अजय सिंग, दयानंद शिर्के उपस्थित होते.