नागपूर
चंद्रपूरच्या (Chandrapur) ताडोबा -अंधारी (Tadoba) व्याघ्र प्रकल्पात नयनतारा (Nayantara) नामक वाघिणीने (Tigress) निमढेला परिसरात एका नाल्यातून पाणी पिण्याआधी तरंगत असलेली प्लास्टिकची बॉटल बाहेर काढली. ही घटना नागपूरच्या (Nagpur) छायाचित्रकार दीपक काठीकर यांनी कॅमेऱ्यात कैद केली होती. त्यांच्या या व्हिडिओला इटलीच्या ग्रीन फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन लीफ (Golden Leaf Award Italy) पुरस्कार देण्यात आलाय.
काही महिन्यांपूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील निमढेला या बफर क्षेत्रात ‘नयनतारा’ या वाघिणीचा वाहत्या नाल्यातून प्लास्टिकची बाटली तोंडात पकडून बाहेर काढतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला. जगभरातच या व्हिडीओची चर्चा झाली. तब्बल २३ सेकंदांचा हा व्हिडीओ वन्यजीवप्रेमी व वन्यजीव छायाचित्रकार दीप काठीकर यांनी चित्रित केला होता. या व्हिडीओतून दोन संदेश बाहेर पडले. एक तर वाघिणीला असलेली पर्यावरणाची चिंता आणि दुसरे म्हणजे ताडोबा व्यवस्थापनाचा बेजबाबदारपणा वन्यजीवांसाठी कसा धोकादायक ठरु शकतो. भानूसखिंडी या प्रसिद्ध वाघिणीच्या पोटी जन्माला आलेली नयनतारा तिच्या डोळ्यांमुळे सतत चर्चेत आहे. तिच्या निळ्या डोळ्यांमुळे पर्यटकांनीच तिचे नामकरण ‘नयनतारा’ असे केले. ताडोबा बफर क्षेत्रातील जांभूळडोह परिसरातील सिमेंट बंधारा परिसरातील नाल्यावर ती पाणी पिण्यासाठी गेली असताना तिच्या तोंडाला पिण्याच्या पाण्याची प्लास्टिक बाटली लागली आणि मग पाणी न पिता ती चक्क ती बाटली घेऊन बाहेर आली.