23.1 C
New York

Vaitarna Dam : मुंबईकरांसाठी खुशखबर, भातसापाठोपाठ वैतरणा धरणही भरले

Published:

मुंबई

मुंबईला पाणी ( Mumbai Rain ) पुरवठा करणाऱ्या सात तलाव क्षेत्रात जुलै महिन्यापासून चांगला पाऊस पडत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांपैकी ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ (Vaitarna Dam) आज दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 2 वाजून 45 मिनिटांनी पूर्ण भरले आहे. ज्यानंतर तलावाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून 706.30 क्युसेक या दराने जल विसर्ग सुरू आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलाव क्षेत्रात जुलै महिन्यापासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे 20 ते 25 जुलै या 6 दिवसांच्या कालावधीत प्रथम तुळशी, नंतर तानसा, विहार, मोडक सागर हे चार तलाव भरून वाहू लागले होते. यानंतर आता 25 जुलै ते 4 ऑगस्ट या 11 दिवसाच्या कालावधीत मध्य वैतरणा हा पाचवा तलाव सुद्धा रविवारी मध्यरात्री 2.45 वाजल्यापासून भरून वाहू लागला आहे. त्यामुळे पहाटे 5.30 वाजता या तलावाचे पाच दरवाजे काही प्रमाणात उघडून त्यातून पाण्याचा विसर्गही करण्यात आला आहे. 20 जुलैपासून 4 ऑगस्ट या अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत सात पैकी पाच तलाव भरून वाहू लागले आहेत. ही मुंबईकरांसाठी खूपच आनंददायी बातमी आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावात रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 12,92,741 दशलक्ष लिटर (89.31 टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. या सात तलावांमधून मुंबईला दररोज 3,850 दशलक्ष लिटर, तर ठाणे आणि भिवंडी पालिका क्षेत्रात दररोज 150 दशलक्ष लिटर असा एकूण 4 हजार दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे सात तलावात जमा पाणीसाठा आणि दररोज होणारा पाणीपुरवठा यांचे गणित केल्यास मुंबईला पुढील 323 दिवस म्हणजे पुढील 22 जुलै 2025 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना पाणी टंचाईचे टेन्शन घेण्याची आवश्यकता भासणार नाही.

सात तलावांमधून मुंबईला वर्षभरासाठी जवळजवळ 14,47,363 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता असते. 50 टक्क्यांच्या जवळपास पाणीसाठा असलेल्या भातसा तलावात रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 6,38,779 दशलक्ष लिटर इतका म्हणजे 89.09 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर, सर्वात शेवटी भरण्यास सुरुवात झालेल्या अप्पर वैतरणा तलावात सध्या 1,51,699 दशलक्ष लिटर म्हणजे 66.81 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. अद्यापही पावसाचे जवळजवळ दोन महिने बाकी आहेत. या कालावधीत पावसाचा जोर कायम राहिल्यास भातसा आणि त्यापाठोपाठ अप्पर वैतरणा तलाव सुद्धा लवकरच भरतील.

मुंबई महापालिकेने पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात 102.4 मीटर उंचीचे आणि 565 मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण सन 2014 मध्ये बांधून पूर्ण केले. हे धरण महापालिकेने विक्रमी वेळेत बांधून पूर्ण केले, असा दावा पालिकेकडून करण्यात येत असला तरी या धरणासाठी आवश्यक सर्व प्रकारच्या परवानग्या मिळविण्यात आणि केंद्र व राज्य सरकार यांच्यातील राजकारण आदी कारणांमुळे पालिकेचे तब्बल 11 वर्षे वाया गेले. या धरणाचे नामकरण ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ असे करण्यात आले आहे.

15 दिवसांच्या कालावधीत असे भरले पाच तलाव

20 जुलै रोजी सकाळी 8.30 तुळशी तलाव भरला

24 जुलै रोजी सायंकाळी 4.16 वाजता तानसा तलाव भरला

25 जुलै रोजी मध्यरात्री 3.50 वाजता विहार तलाव भरला

25 जुलै रोजी सकाळी 10.40 वा. मोडक सागर तलाव भरला

4 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2.45 वाजाता मध्य वैतरणा तलाव भरला

20 ते 25 जुलै या अवघ्या 6 दिवसात सात तलावांपैकी चार तलाव भरले

20 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान 15 दिवसात सात तलावांपैकी पाच तलाव भरले

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img