आगानी विधानसभा निवडणुकांचे (Assembly Elections 2024) जोरदार वारे राज्यभरात वाहू लागले आहेत. अद्याप निवडणुकांची घोषणा झालेली नसली, तरीदेखील प्रत्येक पक्षानं आपापल्या परीनं विधानसभेसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. अशातच आता अजित पवार गटातून (Ajit Pawar Group) एक मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजलगावचे (Majalgaon) आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी निवडणूक त्यांनी लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे.
माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्ती घेत असल्याचं जाहीर आणि आपल्या राजकीय वारसदाराचीही असून घोषणा केली आहे. प्रकाश सोळंके यांनी यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय वारसदार म्हणून पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा केली आहे. सध्या प्रकाश सोळंके हे 2024 च्या आमदारकीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं गावांचे दौरे करत आहेत. त्याचवेळी एका गावात बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तसेच, जयसिंह सोळंके (Jaisingh Solanke) आगामी विधानसभा निवडणुकीत लढणार असल्याची घोषणा केली आहे.
जयसिंह सोळंके कोण?
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे लहान बंधू धैर्यशील सोळंके यांचे जयसिंह सोळंके हे चिरंजीव आहेत. म्हणजेच, प्रकाश सोळंके यांचे पुतणे. जयसिंह सोळंके धारूर पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत. त्यासोबतच बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून जयसिंह सोळंके यांनी यापूर्वी काम पाहिलं होतं. आता जयसिंह सोळंके हेच प्रकाश सोळंके यांचे वारसदार म्हणून आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.