अलीकडेच पुरपरिस्थितीमुळे पुण्यातील एकतानगरसह अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे मोठं नुकसान झालं. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यांनी कालच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेतली होती. यानंतर या भागातील मृतांसाठी तातडीने मदत जाहीर करण्यात होती. दरम्यान, आता राज ठाकरेंनी नुकसानग्रस्तांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या भेटीची माहिती नुकसानग्रस्तांना दिली.
माध्यमांशी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, एका आठवड्यापूर्वी मी पुण्यात येऊन पुरपरिस्थितीची पाहणी करून गेलो होतो, त्यानंतर मी कालच मुख्यमंत्र्यांशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील माझ्या सहकाऱ्यांचं शिष्टमंडळ नेऊन या सगळ्या प्रश्नावर चर्चा केली आणि अनेक विषयांवर तात्काळ कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या भागांत जुन्या इमारतींचा पुनर्विकास होत नाहीये. याला कारण इथे विकासकांना वाढीव एफएसआय मिळत नाही, पण काल मुख्यमंत्र्यांनी या भागात वाढीव एफएसआय मिळावा यासाठी कार्यवाही सुरु करण्याचे आदेश दिले. ज्याचा फायदा या भागात राहणाऱ्या ३ लाख लोकांना होईल, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
Raj Thackeray वाहनधाकरांना नुकसान भरपाई मिळेल…
पुढं बोलतांना ते म्हणाले, इथली अनेक वाहनं पाण्याखाली गेली, त्यांचं नुकसान झालं, त्या वाहनधारकांना विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळत नाही, यावर मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना विमा कंपन्यांशी बोलून ही नुकसान भरपाई मिळेल असं बघायला सांगितलं आहे.
Raj Thackeray मुळा नदीच्या बाजूला संरक्षण भिंत
राज ठाकरे म्हणाले, तसंच मुळा-मुठा रिव्हरफ्रंट प्रकल्पाच्याबाबत तज्ज्ञ पुणेकरांचं आणि पुणे महापालिकेचं मत विचारात घेऊनच होईल असं स्पष्ट आश्वासन दिलं. तसंच नदीच्या बाजूला संरक्षक भिंत उभारण्याचे आदेश दिले आहेत.
Raj Thackeray मृत मुलांना 10-10 लाखांची मदत मिळणार
या पुरात २ मुलांचा नाहक मृत्यू झाला, त्यांच्या जाण्याची भरपाई खरंतर कशाने होऊच शकत नाही, पण तरीही त्यांच्या कुटुंबाला मदत म्हणून दोघांच्या कुटुंबियांना १०, १० लाखांचे धनादेश कालच तयार झालेत आणि ते जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले गेलेत, येत्या १,२ दिवसांत ते धनादेश त्यांच्या कुटुंबियांना मिळतील. तसंच त्यातील एका मृत व्यक्तीच्या भावाला सरकारी नोकरीत सामावून घेतलं जाणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले.