पुणे शहरातील (Pune Rain) खडकवासला धरण (Khadakwasala) क्षेत्राच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर, खडकवासला या परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रातील अतिपर्जन्यमानामुळे मुळा-मुठा नदीस पूर (Flood) आलेला आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढविण्यात आलाय. रविवारी सकाळी विसर्ग हा 29 हजार क्युसेक इतका होता. तर सायंकाळी पाच वाजता विसर्ग 45 हजार क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे मुठा नदीत आणखी पाणी आल्याने पुण्यातील सखल भागात पाणी घुसण्याची शक्यता आहे. सिंहगड भागामध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) आपत्ती व्यवस्थापनाचे पथके सज्ज ठेवण्यात आली आहे. तर अडचणीच्या वेळी नागरिकांना संपर्क साधण्यासाठी महापालिकेने काही संपर्क क्रमांक जाहीर केलेत.
दरम्यान पुण्याचे पूरपरिस्थीवर सरकारचे लक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडकवासला धरणातील पाणी सोडताना काळजी घेण्याचे सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एकाच वेळी पाणी सोडण्यापेक्षा टप्पा-टप्पाने पाणी सोडावे. तसेच धरण क्षेत्रात जास्त पाऊस असल्याने धरणात जास्त पाणीसाठा ठेवू नये, अशा सूचना अजित पवार यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. तर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही प्रशासनाला सूचना दिल्यात.