लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या दाव्यानं राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) खळबळ माजली आहे. 29 जुलै रोजी संसदेत केलेल्या चक्रव्यूह भाषणानंतर अंमलबजावणी संचालनालय (ED) त्यांच्या घरावर छापा टाकण्याची योजना आखत आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. मी आतुरतेनं ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांची वाट पाहत आहे, असंही राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. ईडीच्या सूत्रांनीच यासंदर्भात माहिती दिल्याचंही राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक पोस्ट करत राहुल गांधी यांनी ईडीच्या छापेमारीबद्दल दावा केला आहे. ट्विटर पोस्टमध्ये राहुल गांधींनी ईडीच्या छाप्याबद्दल दावा केला आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “वरवर पाहता, माझं चक्रव्यूह भाषण दोघांपैकी एकाला आवडलेलं नाही. ईडीच्या आतल्या लोकांनी मला सांगितलं की, तुमच्या घरावर छापेमारीची तयारी केली जात आहे. मी आतुरतेनं ईडीची वाट पाहत आहे. मी स्वतःच्या हातानं त्यांना चहा आणि बिस्किटं खाऊ घालणार आहे.” राहुल गांधी यांनी हे ट्वीट करत ईडीच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग देखील केलं आहे. 29 जुलै रोजी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024 वर बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला होता. ते म्हणाले की, देशातील शेतकरी, मजूर आणि तरुण घाबरले आहेत. कमळाचं चिन्ह ठळकपणे प्रदर्शित केल्याबद्दलही राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आणि दावा केला की, 21 व्या शतकात एक नवं ‘चक्रव्यूह’ तयार झालं आहे.
खा.अनुराग ठाकूर विरोधात मुंबई काँग्रेसची निदर्शने
Rahul Gandhi राहुल गांधी ‘चक्रव्यूह’ संदर्भातील भाषणात नेमकं काय म्हटलेलं?
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, “जे ‘चक्रव्यूह’ तयार झालं आहे. यामुळे लोकांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. आम्ही हे चक्र खंडित करू. याला छेद देण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे जातिगणना. ज्याची तुम्हा सर्वांना भीती वाटते. I.N.D.I.A या सभागृहात गॅरंटीड कायदेशीर MSP पास करेल. आम्ही या सभागृहात जात जनगणना पास करून दाखवू.”
महाभारत युद्धातील चक्रव्यूह रचनेचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, महाभारतातील चक्रव्यूहात भीती, हिंसाचार आहे आणि सहा जणांनी अभिमन्यूला अडकवून मारलं. चक्रव्यूहचे वर्णन पद्मव्यूह असं करताना ते म्हणाले की, ते उलट्या कमळासारखं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “नवं चक्रव्यूह तयार केलं आहे, तेही कमळाच्या आकारात, ज्याला आजकाल पंतप्रधान मोदी छातीवर घेऊन फिरतात. अभिमन्यूला द्रोण, कर्ण, कृपाचार्य, कृतवर्मा, अश्वस्थामा आणि शकुनी अशी 6 जणांनी मारलं. आजही चक्रव्यूहाच्या मधोमध 6 लोक आहेत. चक्रव्यूहच्या अगदी केंद्रस्थानी 6 लोक त्यावर नियंत्रण ठेवतात, ज्याप्रमाणे त्यावेळी 6 लोक नियंत्रित करत असत, त्याचप्रमाणे आजही 6 लोक नियंत्रित करत आहेत.