मुंबई
महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला (Mazi Ladki Bahin Yojana) जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सन्मान यात्रेच्या माध्यमातून शिवसेना महिला आघाडीक़डून (Shivsena Mahila Aghadi) राज्यभरात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना सचिव व प्रवक्त्या मा. डॉ मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी आज दिली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना नेत्या मीना कांबळी व शीतल म्हात्रे उपस्थित होत्या.
डॉ. कायंदे म्हणाल्या की, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले आहे. राज्यातील चौथे महिला धोरण लागू करणे, एस.टी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत, लेक लाडकी योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, ८०० कोर्सेसना शिष्यवृत्ती, पिंक रिक्षा, बचत गटाच्या योजनांना भांडवल सहकार्य, सणासुदीला मिळणारा आनंदाचा शिधा, प्रत्येकाच्या नावात आईच्या नावाचा समावेश करणारा अध्यादेश काढणे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि आताची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अशा अनेक योजना लागू केल्या आहेत. यामुळे महिलांचा सर्वांगीण विकास होणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सन्मान यात्रेची सांगता रक्षाबंधन पूर्वी होईल, असे डॉ. कायंदे यांनी सांगितले. सध्या या योजनेतून दररोज लाखो अर्ज सादर केले जात आहेत. मात्र जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा, यासाठी सन्मान यात्रेतील मेळाव्यांतून या योजनेची माहिती दिली जाणार आहे.
ज्यांनी कोट्यवधींचे घोटाळे केले त्यांना महिलांना मिळणाऱ्या १५०० रुपयांचे मोल करणार नाही, अशी टीका शिवसेना उपनेत्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी संजय राऊत यांच्यावर केली. ‘ताई, माई अक्का, आमचा नेता आहे एक्का आणि येत्या निवडणुकीत उबाठाचा पराभव पक्का’ असा टोला म्हात्रे यांनी संजय राऊत यांना लगावला. रक्षा बंधनपूर्वी या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे ३००० रुपये जमा होतील, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, असे म्हात्रे म्हणाल्या. लाडकी बहिण, लाडका भाऊ या योजनांना मिळणारा प्रतिसाद पाहता विरोधकांना पोटशूळ उठाला आहे, अशी टीका त्यांनी केली.