23.1 C
New York

Snake Bite : चार वर्षाच्या चिमुरडीचा सर्पदंशामुळे मृत्यू

Published:

रमेश तांबे, ओतूर

जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगे भोईरवाडी येथील एका चार वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू सर्पदंशाने (Snake Bite) झाला असून, सदर चिमुरडीवर ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी वेळेत उपचार केले नसल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. अफ्रोज अमिर शेख (Afroz Amir Shaikh) वय ४ वर्ष असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की,अफ्रोज शेख ही चिमुरडी सोमवारी ता.२९ रोजी भोईरवाडी येथे आजोबांच्या घरात आई सोबत झोपली होती,रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झोपेत असताना तिला विषारी सर्प चावला.सर्पदंश झाल्यामुळे तिच्या कुटुंबातल्या सदस्यांनी तिला उपचारासाठी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले, मात्र तिथे गेल्यानंतर दवाखान्याचे दरवाजे लावलेले होते असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. काही वेळानंतर रूग्णालयातील कर्मचाऱ्याने दरवाजा उघडला त्यावेळी आम्ही मुलीला साप चावला असल्याचे सांगितले. त्यावेळी परिचारिकेने रूग्णालयातून डॉ.विशाल डुंबरे यांना फोन करून माहिती दिली.डुंबरे यांनी सदर मुलीला नागाचा दंश असल्याने तिला उपचारासाठी पुढे नारायणगाव येथे घेऊन जाण्यास फोनवरच सांगितले.त्यानंतर सदर चिमुरडीला नारायणगाव येथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.

ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल डुंबरे यांनी रूग्णालयात येऊन मुलीला तपासले देखील नसल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी केली असून, तिला जर वेळेत उपचार भेटले असते, तर ती वाचली असती असे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.तरी सदर डॉक्टर वर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. 

माजी जिल्हा परिषद सदस्य व आदिवासी नेते देवराम लांडे यांनी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन सर्पदंश झालेल्या चिमूरडीच्या नातेवाईकांची भेट घेतली. तसेच ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास उपचार करण्यासाठी टाळाटाळ का केली ? याबाबत जाब विचारून,ओतूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्याची वरिष्ठ अधिकाऱ्याकडे फोनद्वारे तक्रार केली आहे.

मनसे तालुकाध्यक्ष तानाजी तांबे म्हणाले की,सदर घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.तसेच अशा घटना टाळण्यासाठी ओतूर ग्रामिण रूग्णालय लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी तांबे यांनी केली आहे.

ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल डुंबरे म्हणाले सोमवारी मध्यरात्री १.२४ वाजता मी कॉर्टरमध्ये झोपलो असताना,मला दवाखान्यातून फोन आला की चार वर्ष वयाच्या मुलीला सर्पदंश झाला असून, तीला पिंपळगाव जोगा येथून आणले आहे आणि तीला उलटी ही झाली आहे.कमी वय आणि आरोग्य केंद्रात व्हेंटिलेटरची सुविधा नसल्यामुळे, मी फोनवरच त्यांना पुढे उपचारासाठी न्यावे लागणार असल्याचे सांगितले.तसेच मी हॉस्पिटल मध्ये येई पर्यंत सदर रूग्णाला घेऊन नातेवाईक नारायणगावला गेले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img