फ्रॅन्कफर्ट
एचआयव्हीची बाधा (HIV/AIDS) झालेल्या जर्मनीतील 60 वर्षे वयाच्या वृद्धाची एचआयव्ही (HIV) चाचणी निगेटिव्ह आली आहे. या वृद्धामध्ये मूळ पेशींचे (स्टेम सेल्स) प्रत्याराेपण करण्यात आले हाेते. मूळ पेशींच्या प्रत्याराेपणाने एचआयव्ही मुक्त झालेली ही जगातील सातवी व्यक्ती आहे. इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठातील (Cambridge University ) सुक्ष्मजीवशास्त्राचे अभ्यासक रविंद्र गुप्ता म्हणाले, की जर्मनीतील व्यक्तीमध्ये प्रत्याराेपण केलेल्या मूळ पेशी एचआयव्हीवर मात करत आहेत, हे पाहुन मी आश्चर्यचकीत झालाे. गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली केंब्रिजमधील संशाेधकांची एक टीम एचआयव्हीबाधीत रुग्णांवर मूळ पेशींचा प्रयाेग करत आहे.
जर्मनीतील बर्लिन येथील टिमाेथी रे हे मूळ पेशींच्या प्रत्याराेपणाने एचआयव्ही मुक्त झालेले पहिले रुग्ण आहेत. रे यांना रक्ताचा कॅन्सर झाला हाेता. त्यांच्या बाेन मॅराेचे प्रत्याराेपण करण्यात आले. त्यांना दात्याने दिलेल्या मूळ पेशींनी रे यांच्या गुणसूत्रात केलेले बदल एचआयव्हीच्या विषाणूला क्षीण करण्यात महत्वाची भूमिका बजावली. दात्याच्या मूळ पेशींमध्ये असलेल्या सीसीआर ५ या मूळ पेशी ग्रहण करण्याच्या घटकाने रे यांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम करणाऱ्या एचआयव्हीच्या विषाणूंना निकामी केले. त्यामुळे रे बरे हाेत गेले. यातून अनेक संशाेधकांनी सीसीअार ५ हा घटक एचआयव्ही बरा करण्यात सर्वात प्रभावी पर्याय असल्याचा दावा केला आहे.
संशाेधन अद्याप परिपूर्ण नाही
सीसीआर ५ हे एचआयव्ही बरा हाेण्यासाठी अंतीम उत्तर नसल्याचे ऑस्ट्रेलियातील पिटर डाेहर्टी इन्स्टिट्यूटचे संशाेधक शराॅन लेविस यांचे म्हणणे आहे. सीसीआर ५ घटकाचे म्युटेशन सर्वच रुग्णांमध्ये हाेत नसल्याचे काही संशोधकांचे निरीक्षण आहे. त्यामुळे सीसीआर ५ हे अंतीम उत्तर नसल्याचे लेविस यांचे म्हणणे आहे. याला पुष्टी देणारे निरीक्षण अलीकडेच नाेंदवले गेले आहे. सहा वर्षांपूर्वी एचआयव्ही मुक्त झालेल्या एका व्यक्तीमधील मूळ पेशी एचआयव्हीचा प्रतिकार करण्यात कमी पडत असल्याचेही निदर्शनास आले आहे.