मुंबई
- मध्य रेल्वेची लोकल (Central Railway) सेवा विस्कळीत झाली आहे. चुकीच्या सिग्नलमुळे मालगाडी ही बदलापूरच्या मध्येच थांबली आहे. अंबरनाथहुन कर्जतकडे (Badlapur Karjat Train) जाणारी वाहतूक रखडली आहे. कर्जतकडे जाणारी मालगाडी चुकीचा सिग्नल दिल्यामुळे बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मवर थांबून आहे. कर्जतकडे जाणारा रेल्वेमार्ग आणि बदलापूरचा होम प्लॅटफॉर्म असे दोन्ही मार्ग बंद झाले आहेत. कर्जतकडे जाणारी संपूर्ण रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. मालगाडी मुख्य मार्गावर आणण्यासाठी आणखी तासभर वेळ लागण्याची शक्यता आहे.
सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी दोन सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बदलापूर स्टेशनवर मालगाडीला चुकीचा सिग्नल मिळाला आणि मालगाडी बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मवर गेली. त्यामुळे कर्जत आणि बदलापूर दोन्ही मार्ग बंद झाले आहेत. मालगाडी मूळ ट्रॅकवर आणण्यासाठी अजून बराच अवधी लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.
ऑफिसमधून घरी निघण्याच्या वेळेलाच ही समस्या निर्माण झाली आहे. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे ऑफिसवरून घराच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. प्रवाशांची गर्दी झाली असून ते लोकलची वाट पाहत आहेत. काही प्रवाशी स्टेशनवर न थांबता मिळेल त्या वाहनाने घरी निघाले आहेत.