22.3 C
New York

Uran Murder Case : शक्ती कायदा कठोर करा – शर्मिला ठाकरे

Published:

नवी मुंबई

उरण मध्ये 22 वर्षीय तरुणी यशश्री शिंदेची (Yashshree Shinde) निर्घृण हत्या (Uran Murder Case) झाल्यानंतर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. तसेच आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी केली. मनसे नेते राज ठाकरे यांच्या पत्नी आणि मनसे पक्षाच्या नेत्या शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनीही आज शिंदे कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांची आज भेट घेतली. उरण पोलिसांशी (Uran Police) चर्चा करून नवी मुंबई आणि उरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचारांची तीन प्रकरणे घडली आहेत. त्यावर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषांना कोणतीही दयामाया दाखवू नका, तसेच त्यांचा धर्म न बघता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी केली.

शर्मिला ठाकरे यांनी या तिन्ही घटनांबद्दल संताप आयुक्तांकडे व्यक्त केला. राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे. अशा प्रकरणात कोणताही राजकीय पक्ष पोर्शे कार सारखा हस्तक्षेप करत नाही. मग पोलिसांची दहशत का दिसत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पोलिसांची दहशत दिसली पाहिजे अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच शक्ती कायदा मंजूर करून त्याच्या अंमलबजावणी साठी मनसे केंद्रात पाठपुरावा करेल असेही शर्मिला वहिनी यांनी सांगितले.

शर्मिला ठाकरे यांनी पोलिसांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, आम्ही पोलिसांवर प्रचंड नाराज आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये कारवाई करताना पोलिसांना कोणताही राजकीय पक्ष अडवणार नाही. मुलींची सुरक्षा ही तुमची जबाबदारी आहे. अशा घटना घडल्यानंतर कोणताही पक्ष तुम्हाला अडवणार नाही. जसं पुण्यातील पोर्शे प्रकरणात कोणत्या तरी आमदाराने पोलीस ठाण्यात जाऊन कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. तसे या प्रकरणात घडणार नाही. तुम्ही तुमची दहशत दाखवा, काय चाललंय हे, अशा शब्दांत शर्मिला ठाकरे पोलिसांवर कडाडल्या.

उरण हत्याकांडाविषयी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी म्हटले की, हिंस्त्रपणा म्हणजे किती असावा? निर्भया प्रकरणात 16 वर्षांचा मुलगा सुटला. ज्या मुलात इतकी विकृती असेल, त्याला आयुष्यभर तुरुंगात ठेवलं पहिजे, किंबहुना फाशीच दिली पाहिजे. अशा गुन्हेगारांना रोखायचं असेल तर पोलीस काय करु शकतात, हे या नराधम पुरुषांना कळाले पाहिजे, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले.

शर्मिला ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठीचा शक्ती कायदा कठोर करण्याची मागणी केली. पंतप्रधान मोदी यांच्याकडे कायदा कठोर करा, याविषयी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. नवी मुंबईतील ही तिसरी घटना आहे. दोन महिन्यात कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. उरण, तळोजा आणि न्हावा परिसरात या घटना घडल्यात. पोलिसांवर मी नाराजी व्यक्त केलीय. साहेब नेहमी पोलिसांचं कौतुक करतात. मात्र, आता आम्ही नाराज आहोत. या घटनानंतर ब्रिटिशकालीन काळात तशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे आता कायदे बदलण्याची गरज आहे. फास्ट ट्रॅकवर सगळं व्हायला हवं. पोलिसांनी ठरवलं तर काहीही करू शकतात. अशा काही घटनात राजकीय हस्तक्षेप होत असेल तर पोलिसांनी त्यांची नावे उघड करावीत. पोलिसांकडे आम्ही नाराजी व्यक्त केली आहे.पोलिसांनी आता गुन्हेगारांविरोधात जहाल भूमिका घ्यावी, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले.

यावेळी मनसेच्या शिष्टमंडळात सौ. शर्मिला वहिनी राजसाहेब ठाकरे, मनसे सरचिटणीस सौ. शालिनी ताई ठाकरे, सौ. रिटा ताई गुप्ता, सौ. स्नेहलताई जाधव, मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष श्री. गजानन काळे, रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. संदेश ठाकूर, पनवेल जिल्हा अध्यक्ष श्री. योगेश चिले उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img