रमेश तांबे, ओतूर
ओतूर येथील (Otur) ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर श्रावणी सोमवार यात्रेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे,मार्गदर्शक जी.आर.डुंबरे यांनी दिली.
ओतूर ता.जुन्नर येथील ग्रामदैवत कपर्दिकेश्वराची यात्रा श्रावण महिन्यात भरते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भावीक दरवर्षी श्रावण महिन्यात श्री कपर्दिकेश्वर मंदिरातील शिवलिंगावरील तयार करण्यात येणाऱ्या कोरड्या तांदळाच्या कलात्मक पिंडींचे दर्शन घेण्यासाठी ओतूरला येतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथील कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलिंगावर तयार करण्यात येणाऱ्या कोरड्या तांदळाच्या कलात्मक पिंडींचे दर्शन घेण्यासाठी भाविक हर.. हर.. महादेव चा जयघोष करीत दर्शनासाठी येतात.या ठिकाणी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मोठी यात्रा भरते.
श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्था व ग्रामस्थांच्या वतीने प्रत्येक श्रावणी सोमवार यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. श्री कपर्दिकेश्वर पहिला श्रावणी सोमवार दि.५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते ११ वाजता शालेय दिंडी महोत्सव व दुपारी १२ ते ६ वाजता वारकरी भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुसरा श्रावणी सोमवार दि.१२ रोजी सकाळी ९ ते ६ या वेळेत संगीत भजन स्पर्धा ,तिसरा श्रावणी सोमवार दि.१९ सप्टेंबर रोजी व चौथा श्रावणी सोमवार दि.२६ रोजी दुपारी १ ते ५ वाजता कुस्त्यांचा भव्य आखाडा भरणार असून उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार २७ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजता शिळा आखाडा भरणार असून, यात्रेची सांगता होणार असल्याचे अनिल तांबे यांनी सांगीतले. तसेच दि.२ सप्टेंबर रोजी पाचवा श्रावणी सोमवार,सोमवती अमावस्येनिमित्त सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडे राहणार असल्याचे श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.