मुंबई
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Decision) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, नांदेड येथील श्री गुरुजी रुग्णालयास शासकीय भाग भांडवल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीत कर्ज देण्यात येईल. तर, महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवेसाठी अध्यादेश जारी करण्यात आला आहे. यासह, उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत 81 हजार कोटींच्या विशाल व अतिविशाल प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात सुमारे 20 हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. कोकणसह मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे.
याप्रकल्पांची माहिती
जेएसडब्ल्यु एनर्जी पीएसपी इलेव्हन लि., यांचा लिथियम बॅटरी निर्मितीचा अतिविशाल प्रकल्पासाठी गुंतवणुक. हा प्रकल्प नागपूर भागात होणार आहे. प्रकल्पामध्ये एकूण २५ हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे. ५००० पेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे.
जेएसडब्ल्यु ग्रीन मोबिलीटी लि. कंपनी इलेक्ट्रीक आणि हायब्रीड वाहन निर्मितीचा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणारा राज्यातील पहिलाच अतिविशाल प्रकल्प आहे. हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण २७ हजार २०० कोटी एवढी गुंतवणूक होणार असून, ५२०० पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामध्ये वार्षिक ५ लाख इलेक्ट्रीक प्रवासी कार व १ लाख व्यावसायिक कार निर्मितीचे नियोजन आहे.
हिंदूस्थान कोका कोला बेव्हरेज मार्फत फळाचा पल्प आणि रस यावर आधारित उत्पादन निर्मितीचा विशाल प्रकल्प रत्नागिरी येथे होणार आहे. १५०० कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे.
आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमार्फत सेमीकंडक्टर चिप्स निर्मितीचा एकात्मिक प्रकल्प तळोजा/पनवेल, जि. रायगड/पुणे/उर्वरीत महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातला हा पहिलाच सेमीकंडक्टर निर्मिती करणारा प्रकल्प आहे. याप्रकल्पामध्ये प्रथम टप्यात रूपये १२ हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार. ४००० पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. दुसऱ्या टप्यामध्ये एवढीच गुंतवणूक होणार आहे. महापे, नवी मुंबई येथे प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, प्रायोगिक तत्वावर सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू होणार आहे.
आवाडा इलेक्ट्रो कंपनीचा सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझरचा एकात्मिक प्रकल्प अतिरिक्त एमआयडीसी, बुटीबोरी जि. नागपूर आणि एमआयडीसी भोकरपाडा, ता. पनवेल जि. रायगड या परिसरात उभारण्यात येणार आहे. कंपनीमार्फत नवीकरणीय ऊर्जा स्रोताचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित राज्यात प्रकल्प स्थापित होणार आहे. प्रकल्पामध्ये एकूण १३ हजार ६४७ कोटी एवढी गुंतवणूक होणार असून, याद्वारे ८००० पेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे.
परनॉर्ड रिकार्ड इंडिया प्रा.लिमिटेड मार्फत मद्यार्क निर्मितीचा विशाल प्रकल्प अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसी, नागपूर येथे स्थापन करण्याचे नियोजित आहे. प्रकल्पामध्ये रू. १७८५ कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय
- 1 विविध विभागांच्या वसतीगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ. (सामाजिक न्याय)
- 2 महिलांच्या सक्षमीकरणासाठी जेंडर ट्रान्सफॉरमेटीव्ह मॅकॅनिझम उपक्रम राबविण्यास मान्यता. 2685 कोटी प्रकल्पास मान्यता. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीमार्फत कर्ज. (महिला व बाल विकास)
- 3 आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज (आदिवासी विकास)
- 4 नांदेड येथील श्री गुरुजी रुग्णालयास शासकीय भाग भांडवल (सहकार)
- 5 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवेसाठी अध्यादेश (गृह)
- 6 जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरण व आधुनिकीकरणाचे शासन धोरण. (जलसंपदा)
- 7 पूणांमाय सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य. (वस्त्रोद्योग)
- 8 राज्यातील यंत्रमाग सहकारी संस्थांना आता राज्य शासनाकडून अर्थसहाय्य. (वस्रोद्योग)
- 9 आदिम जमातीतील कुटुंबांसाठी आवास योजना (ग्राम विकास)
- 10 ठाणे महापालिकेच्या विविध उपक्रमांसाठी शासकीय जमीन देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.