23.1 C
New York

Annapurna Yojana : ‘लाडकी बहीण’नंतर आता महाराष्ट्रात अन्नपूर्णा योजना, इतके गॅस सिलेंडर मोफत मिळणार!

Published:

मुंबई

लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्य सरकारने राज्यातील महिलांना खूश करणारा आणखी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. याबबतचा शासन आदेश देखील काढण्यात आला असून, या योजनेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना (Annapurna Yojana) असं नाव देण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंड मोफत मिळणार आहेत. पण योजनेसाठी नमूद अटींनुसार महिलांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असणार आहे. याशिवाय एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर मिळणार नाहीत, अशीदेखील अटक आहे.

महाराष्ट्र शासनाचा सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच, मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, असं शासनाच्या निर्णयात म्हटलं आहे.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर योजना “मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना” या नावाने राबविण्यात येईल. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण तसंच अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली होती. यानंतर लाडकी बहीण योजनेचे पहिल्या दोन महिन्यांचे 3 हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात राखी पौर्णिमेला जमा होणार आहेत, यानंतर आता अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

लाभार्थ्यांची पात्रता काय?
सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
सद्यःस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटूंब सदर योजनेस पात्र असेल.
एका कुटूंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल.
सदर लाभ केवळ १४.२ कि. ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय असेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img