राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. (Ajit Pawar) विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी आढावा बैठका, सभा, मेळावे, पदाधिकाऱ्यांच्या बैठका होऊ लागल्या आहेत. निवडणुकीत आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. पण दुसरीकडे, अजित पवार यांच्या गटाला गळतीही लागल्याचे दिसत आहे. पुण्यातील बड्या नेतेमंडळींना रामराम केल्यानंतर दोन-तीन दिवसांपूर्वी परभणीतील अजित पवार यांच्या गटाचे बाबाजानी दुर्रानी यांनीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्यानंतर आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या हालचालींमध्येही बदल झाल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रविवारी (27 जुलै) हे नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी बैठकही घेतली. पण या बैठकीला नरहरी झिरवळ यांनीच पाठ फिरवली. या बैठकीला ते का हजर राहिले नाहीत, याबाबत त्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे आता नरहरी झिरवळ हेदेखील शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जर झिरवळांनीही शरद पवार गटात प्रवेश केला तर हा पक्षप्रवेश अजित पवारांसाठी मोठा धक्का असेल.
राहुल गांधी आज लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलणार?
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून झिरवळ यांचे पुत्र गोकूळ झिरवळ हे शरद पवार यांच्या गटात सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत निष्ठावान संवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला गोकूळ झिरवळ यांनीदेखील उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना गोकूळ झिरवळ म्हणाले होते की, मी शरद पवार यांच्यासोबत राहावे अशी माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. लोकसभा निवडणुकीत मी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना मदत केली. त्यांना निवडून आणण्यासाठी मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी काम केलं आहे. मुलाच्या या भूमिकेनंतर नरहरी झिरवळ हेदेखील शरद पवार गटाकडे परत येऊ शकतात किंवा आपल्या मुलाला शरद पवार गटाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरवू शकतात, अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.