23.1 C
New York

Bacchu Kadu : तिसरी आघाडी नाही, तर शेतकऱ्यांची आघाडी; बच्चू कडूंची मोठी घोषणा

Published:

नागपूर

राज्यातील राजकीय पक्षांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला (Assembly Elections) सुरुवात केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढण्याची चिन्ह आहेत. सध्याची परिस्थिती पाहिली तर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) यांच्यातच लढत होईल अशी शक्यता आहे. या दोन्ही आघाड्यांनी तशीच तयारीही सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा लवकरच सुरू होतील. दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षही सज्ज झाले आहेत. परंतु, आता महायुतीला धक्का देणारी बातमी आली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी (Bacchu Kadu) मोठी घोषणा केली आहे. निवडणुकीत तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी (Farmers Alliance) असणार, अशी घोषणा कडू यांनी केली.

बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली. येत्या 9 ऑगस्टला सभा घेऊन आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत असे त्यांनी सांगितले. या नव्या आघाडीत येण्यासाठी बच्चू कडूंनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनाही खुलं आमंत्रण दिले आहे. जरांगेंना शेतकरी आघाडीत यायचं असेल तर त्यांचं स्वागतच आहे, असे कडू म्हणाले.

काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी शिंदे गटाबरोबरच राहण्याची भूमिका घेतली होती. आम्ही दोन वर्षांपासून शिंदे साहेबांसोबत आहोत. आताही त्यांच्यासोबत आहे. त्यांनी मतदारसंघात भरपूर निधी दिला. मी स्वत: आणि आमदार राजकुमार पटेल आम्ही दोघे शिंदे साहेबांसोबत आहोत. मतदारसंघात आम्हाला भरपूर निधी मिळाला. आम्ही आमचे कर्तव्य बजावणार आहोत असे त्यांनी सांगितले होते.

लोकसभा निवडणुकीत मात्र बच्चू कडूंनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार दिला होता. या मतदारसंघात राणा यांचा पराभव झाला होता. यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठीही बच्चू कडूंनी नवी आघाडी सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महायुतीत अस्वस्थता वाढली आहे. या घडामोडीवर महायुतीतील घटक पक्षांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img