मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) अगोदर राज्यातील जनतेला राज्य सरकारचा आनंदाचा शिधा मिळणार आहे. जनसामान्यांनाही सण आनंदाने साजरे करता यावेत यासाठी सुरू करण्यात आलेली ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) ही योजना गौरी, गणपती उत्सवासाठी (Ganeshotsav) देखील राज्य सरकार राबविणार आहे. राज्यातील 1 कोटी 70 लाख 82 हजार 86 शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ चे वाटप 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत करण्यात येईल.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्य सरकार कामाला लागले असून विविध योजनांचा प्रचार जोरदार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील जनतेला राज्य सरकारचा आनंदाचा शिधा मिळणार आहे. गणेशोत्सवात राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटला जाणार आहे.
7 सप्टेंबरला गणेशोत्सवाची सुरूवात असून ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं सर्व जनतेपर्यंत गणेशोत्सवात आनंदाचा शिधा पोहचविण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. 100 रूपयांत प्रत्येकी एक किलो रवा, साखर, चनाडाळ आणि खाद्यतेल लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी टेंडर प्रक्रियेला वेग आला आहे.
या टेंडर प्रक्रियेतील अटी आणि शर्थी शिथील केल्याने यावेळी 9 कंपन्यांचा टेंडर प्रक्रियेत सहभाग होणार आहे. यापूर्वी केवळ दोन ते तीन कंपन्या यामध्ये सहभागी होत होत्या. दरम्यान, आनंदाचा शिधा हा निकृष्ट दर्जाचा आणि खूप उशिरा वितरीत होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तसंच विरोधकांकडून आरोप झाले होते. परंतु निवडणुकीच्या तोंडावर यावेळी असे प्रकार घडू नयेत याची काळजी सरकार घेत आहे.