पुणे
पुण्यात गुन्हेगारीच्या (Pune Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यात सर्वसामान्य नागरिक असुरक्षित असतांना आता पोलिस देखील सुरक्षित नसल्याचं पुढं आलं आहे. त्यामुळे सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीने महिला पोलिस कर्मचाऱ्याचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी पहाटे विश्रांतवाडी परिसरात घडली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी पतीला अटक केली आहे. हर्षद विकास पानसरे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी महिला पोलिस कर्मचारी रोहिणी श्यामराव भोकसे- पानसरे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी भोकसे पुणे शहर पोलिस दलात पोलिस कर्मचारी आहेत. त्यांचा पती हर्षद हा रोहिणी यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना शिवीगाळ करीत होता. हर्षद आणि रोहिणी यांच्यात पुन्हा शनिवारी वाद झाला. त्यावेळी पतीने रोहिणी यांचा गळा आणि तोंड दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, मारहाण करून सोशल मीडियावर बदनामीकारक संदेश पाठविण्याची धमकी दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके करीत आहेत.