मुंबई
भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रकाश मेहता (Prakash Mehta) यांनी आपण आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Elections) लढणार असल्याचे जाहीर केले आहे. पक्षाने उमेदवारी जाहीर करण्या आधीच मेहता यांनी आपली उमेदवारी जाहीर करून बंडखोरीचे संकेत दिले आहेत. शिवाय पक्ष हा निवडणुकी पुरता असतो त्या आधी आणि त्यानंतर सामाजिक बांधिलकी ही महत्वाची असते, असे सांगत त्यांनी बंडाची भाषा केली आहे.
2019 च्या निवडणुकीत प्रकाश मेहता यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर मेहता हे राजकारणाच्या मुळ प्रवाहापासून दूर होते. शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही त्यांना प्रचारापासून दूर राहण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मेहता हे सध्या पक्षात नाराज आहेत. त्यांनी निवडणूक लढणार असे जाहीर करत या नाराजीला वाट करून दिली आहे.
प्रकाश मेहता मित्र मंडळाच्या माध्यमातून एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून प्रकाश मेहता यांनी पुढील भूमिका स्पष्ट केली. लोकसभा निवडणुकीत आपल्याला प्रचारापासून रोखण्यात आले होते असा गौप्यस्फोटही मेहता यांनी केला. शिवाय निवडणुकीत नियोजनही चुकले. त्यामुळेच पराभव झाला असे प्रकाश मेहता म्हणाले.
आपण आतापर्यंत सात वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आहे. पण एकदाही पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही. पक्षाने समोरून उमेदवारी दिली होती. यावेळी मात्र आपण निवडणूक लढणार आहे. त्यासाठी तयारीला लागा असा आदेश त्यांनी आपल्या समर्थकांनी दिला.