मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने एकत्रित निर्णय घ्यायला हवा. नुसती घुमवाघुमवी करू नका. या दोघांनी मिळून मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षण द्यायला काहीच लागत नाही. मनात असेल तर देता येते. आमचा जीव आरक्षणात आहे पण ह्यांचा जीव खुर्चीत आहे. आरक्षण मिळू दिले नाही तर आम्ही सत्तेत येऊ देणार नाही. तुम्ही जर आरक्षण देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावी लागेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत. येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधत महायुती आणि महाविकास आघाडीलाही इशारा दिला. जरांगे पाटील पुढे म्हणाले, आरक्षण द्यायला काहीच लागत नाही, मनात असेल तर काही करता येते मनात असेल तर देता येते. त्यांनी लाईव्ह बैठक घेण्यापेक्षा डोंगरावर जाऊन मोठ्याने बोला आणि लाईव्ह करा. यांच्या कुठेही भेटी होतात मात्र आरक्षणासाठी बोलत नाहीत. ते येत नाहीत आणि म्हणतात आम्ही लाईव्ह करायचे. ७० वर्षांपासून सगळे वेड्यात काढत आहेत अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी शरद पवार आणि मराठा समन्वयकांच्या बैठकीवर दिली.
सुप्रिया सुळेंनी सांगितला शरद पवारांचा हलवा क्षण !
लोकांच्या मनात खदखद आहे. लोकांना समजते की आपल्याला कोण उल्लू बनवत आहे. विरोधक आणि सत्ताधारी हे उल्लू बनवत आहेत. न्याय मिळून द्यायचा असेल तर एकत्रित यावे. आमचा जीव आरक्षणात आहे पण यांचा जीव खुर्चीत आहे, आरक्षण मिळू नाही दिले तर आम्ही सत्ता येऊ देणार नाही. तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावी लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. प्रवीण दरेकरांबद्दल मला बोलायचं नाही, आमचं ध्येय आरक्षण मिळविणे आणि पाडापाडी करणे हेच आहे. त्यांच्या आजूबाजूचे लोकं त्यांना समजावून सांगत नाहीत, जवळील लोक एकाचे दोन सांगतात. फुकटात निवडून येणारे मिसगाईड करतात. गैरसमज निर्माण करतात पण आता मराठ्यांच्या लाटेत ते होरपळून जाणार आहेत असे जरांगे पाटील म्हणाले.
राजकीय लोकांचे डाव असून मराठा समाज मोठा झालेला यांना जमत नाही. सत्ताधारी आणि विरोधकांकडून गैरसमज पसरवले जात आहेत. माझ्या समाजाने नेत्यांच्या फक्त हमाल्याच करायच्या का ? विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांचे हे समाजासाठी नाटक आहे. समाजात गोंधळ निर्माण करुन गैरसमज पसरवण्याचे षडयंत्र आहे. समाजाला वेड्यात काढण्यासाठी हा चालुपणा केला जात असल्याची टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.