मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईवरील पाणी संकट दूर होणार आहे. (Mumbai Water Cut) कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. सात जलाशयांपैकी ३ जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. तर इतर जलाशयांमधील पाणीसाठ्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईतील १० टक्के पाणीकपात येत्या २९ जुलैपासून रद्द करण्यात येणार आहे. पाणीकपात मागे घेणार असल्याची घोषणा मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचे पाणी टेन्शन दूर होणआर आहे.
मुंबई महानगर पालिकेने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ७१.०२ टक्के इतका झाला आहे. २६ जुलै रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा १०,२७,९२५ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ७१.०२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणांमध्ये ८,५२,९५७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा मागच्या वर्षी याच दिवशी होता. म्हणजेच ५८.९२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडकसार धरण, विहार तलाव आणि तुलसी तलाव हे ओव्हर फ्लो झाले आहेत. सगळ्यात कमी पाणीसाठा अप्पर वैतरणा धरणात आहे. पण गेल्यावर्षीच्या तुलनेत या सातही जलाशयांमधील पाणीसाठा जास्त आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाची सद्यस्थिती काय ?
मुंबई शहर आणि उपनगराला ५ धरण आणि २ तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ जलाशयांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यासातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये आहे. मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा या धरणांमधून केला जातो.
Mumbai Water Cut मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा –
- अप्पर वैतरणा – ३१.४१ टक्के पाणीसाठा
- मोडक सागर – १०० टक्के पाणीसाठा.
- तानसा – ९८.६१ टक्के पाणीसाठा.
- मध्य वैतरणा – ६९.४० टक्के पाणीसाठा
- भातसा – ६९.२० टक्के पाणीसाठा.
- विहार – १०० टक्के पाणीसाठा.
- तुलसी – १०० टक्के पाणीसाठा.