मुंबई
नाना पटोले (Nana Patole) हे काँग्रेसचे आहेत की भाजपचे (BJP) आहेत हे अनेकांना पडलेलं कोडं आहे. काही कार्यकर्ते म्हणत होते की गडकरीचा पोपट आता मिठू मिठू बोलू लागला आहे. पटोले आणि विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आरक्षण बचाव यात्रेवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे (Siddharth Mokle) यांनी दिला आहे. आरक्षणाच्या (Reservation) संदर्भात स्पष्ट भूमिका न घेता तळ्यात मळ्यात करण्यापेक्षा त्यांनी मराठा (Maratha) आणि ओबीसी (OBC) आरक्षणाच्या संदर्भात काँग्रेस पक्षाची भूमिका जाहीर करावी, असेही मोकळे यांनी म्हटले आहे.
सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली होती की, सर्व पक्षांच्या आरक्षणाच्या संदर्भातील भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षांना पत्र लिहून भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. मात्र, वंचित बहुजन आघाडी वगळता कोणीही भूमिका स्पष्ट केली नाही. आरक्षणाच्या प्रश्नावरून समाजात दुरावा निर्माण झाला आहे. समाजात एकोपा निर्माण होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रा काढली आहे. नाना पटोले यांनी या यात्रेवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी.
सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांच्यावरही मोकळे यांनी निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार यांना या संदर्भात बोलण्याचा अधिकारच नाही. मोकळे यांनी इतिहासाचा दाखला देत सांगितले की,1989 मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर हे वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाकडे गेले होते आणि आंबेडकरांनी सांगितले होते की, ओबीसी आरक्षणाचा तिढा आपण सोडवूया, ओबीसी आरक्षणाला संविधानिक स्वरूप देवूया. त्यावेळी वडेट्टीवार यांच्या पक्षाने नकार दिला, सहकार्य केले नाही म्हणून वडेट्टीवार यांना या संदर्भात बोलण्याचा अधिकार नाही.
सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, ओबीसींच्या व्यासपीठावर जाऊन तुम्ही भाषणे ठोकता, पण तुमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करत नाही. या तुमच्या दुटप्पी धोरणाला जनता थारा देणार नाही. त्यामुळे यापुढे वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण बचाव यात्रेवर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्रात पेटलेले वातावरण शांत कसे करता येईल ते बघा. समाजाने तुम्हाला तुमच्या तुंबड्या भरायला पाठवलेले नाही, तर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठवले आहे याचे भान ठेवा असे म्हणत मोकळे यांनी नाना पटोले आणि वडेट्टीवार यांचा खरपूस समाचार घेतला.