राजापूर
महाराष्ट्रामध्ये पावसाने मागील दोन दिवसांपासून थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक धरणे आणि नद्या ओसंडून वाहत होत्या. त्यामुळे अनेक धरणांच्या परिसरामध्ये असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्याचबरोबर अनेक धरणांचे पाणी देखील सोडले होते. राजापूरमध्ये (Rajapur) अशा प्रकारची धक्कादायक परिस्थिती काल गुरुवार पासून आहे. राजापूर तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी रात्री राजापूर शहराला (Rajapur Rain) पुराच्या पाण्याचा पुन्हा एकदा फटका पडला आहे. गुरुवारी मध्यरात्रीच अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली होती. त्यामुळे शुक्रवारी पहाटे जवाहर चौक पाण्याखाली गेला. व्यापा-यांनी (Traders) आधीच दक्षता घेतल्याने मोठी आर्थिक हानी झाली नाही.
राजापूर तालुक्यात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. शहरात आतापर्यंत पाच वेळा पाणी शिरल्याने व्यापारांची चांगलीच धावपळ झाली आहे. सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी शहरातून जाणाऱ्या अर्जुन नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुराचा शक्यता लक्षात घेता नागरिक व व्यापाऱ्यांनी अगोदरच दक्षता घेतली होती.
मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढल्याने शुक्रवारी पहाटे पुराचे पाणी जवाहर चौकाच्या दिशेने यायला सुरुवात झाली होती. मात्र सकाळी संपूर्ण जवाहर चौक पाण्याखाली गेला होता. राजापूर शहरातील चिंचबांध मार्गे शीळ गोठणेकडे जाणारा रस्ताही पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. तर शहराच्या अन्य भागातही काही ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे. शुक्रवारी सकाळपासुन पावसाने पुर्णत: उघडीप घेत उण पडले असले तरी पुराचे पाणी अद्यापही जवाहर चौकात ठाण मांडुन असल्याने एस्टी सेवा बंद ठेवण्यात आली असल्याने प्रवासांचे हाल झाले आहेत तर शहरातील वाहतुक व्यवस्था आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे.