21 C
New York

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात दोन तरुण जखमी

Published:

रमेश तांबे, ओतूर

ओतूर येथील पाथरटवाडीतील दोन तरूण दुचाकीवरून आपल्या घरी जात असताना, ओतूर पाथरटवाडी येथील सुटूंबा टेकडी जवळ बिबट्याने (Leopard Attack) दोन तरूणांच्या दुचाकी वर हल्ला करून दोघांना जखमी केल्याची घटना गुरूवार दि.२५ रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुरेश राजेंद्र सावंत वय २३ व सुरज राजेंद्र पानसरे वय १९ रा.ओतूर पाथरटवाडी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन तरूणांची नावे आहेत.

याबाबत ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे हे माहिती देताना म्हणाले की, ओतूर पाथरटवाडी येथील सुरेश सावंत आणि सुरज पानसरे हे दोघे गुरूवारी ओतूर येथून आपल्या घरी जात असताना, रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने प्रथम सुरेश सावंत याच्या दुचाकीवर झडप मारून सुरेश यास जखमी केले, त्यानंतर दहा मिनिटांनी पुन्हा त्याच ठिकाणी सुरज पानसरे या तरुणांच्या दुचाकीवर बिबट्याने झडप मारून त्याला देखील जखमी केले. या दोन्ही घटना घडल्यानंतर ओतूर,पाथरटवाडी, शेटेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दोघा जखमींना श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे यांनी प्राथमिक उपचार करण्यासाठी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली  वनपाल  सुधाकर गिते,वनरक्षक विश्वनाथ बेले, वनसेवक फुलचंद खंडागळे, यांनी जखमींना पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात नेले. हल्ला झालेल्या ठिकाणी वनविभागाने दोन पिंजरे लावले आहेत.पिंजरा लावण्यासाठी पोपट मालकर ,संपत घुले,विशाल घुले,मनोज सावंत, मयुर मालकर,अजय मालकर, नामदेव शेटे, सुधाकर घुले, माऊली पाथरट यांनी मदतकार्य केले.

ग्रामस्थ,व सर्व नागरिकांना वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर यांच्याकडून आवाहन करण्यात येते की,आपण बिबट प्रवण क्षेत्रात राहत असून सध्या पावसाळा सुरू झाल्याने बिबट्या रस्त्याच्या कडेला, कोरड्या जागी दबा धरून बसण्याची शक्यता असते, यामुळे आपण सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे, रात्री अपरात्री एकट्याने बाहेर फिरू नये,आपल्या घराभोवती दिवे लावावेत, आपले पशुधन बंदिस्त गोठ्यात ठेवावे.लहान मुलांनी शाळेत जाताना समुहाने जावे, पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी आपल्या परीसरातील रस्ते, झुडपे मुक्त असावेत असे आवाहन वनविभागाकडुन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img