मुंबई
वरळीतील स्पामध्ये (Mumbai Worli Spa) हत्या झालेल्या गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या (Guru Waghmare) हत्येचं गूढ अखेर उकललं आहे. गुरू वाघमारे उर्फ चुलबुल पांडे याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. खंडणीच्या त्रासाला कंटाळून सहा लाखांची सुपारी देत गुरु वाघमारे याची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. 52 वर्षीय गुरू वाघमारेची हत्या ही त्याच्या 21 वर्षीय गर्लफ्रेंडसमोर धारदार शस्त्राने वार करून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपींनी पोलीस तपास दरम्यान धक्कादायक खुलासा केला आहे. मृत गुरुच्या शरीरावर २२ नावांचे टॅटू होते. वाघमारे याने त्याच्या शत्रूंची नावे टॅटूच्या रुपात दोन्ही पायांच्या मांड्यावर कोरून ठेवली होती. या टॅटूमध्ये सुपारी देणाऱ्याचे नाव देखील असल्याचे समोर आलं आहे. पोलिसांसाठी खबऱ्या म्हणून काम करणाऱ्या गुरु वाघमारे याची स्पाच्या मालकानेच हत्या केल्याचे उघड झालं आहे. स्पा विरोधातील तक्रारी आणि खंडणीच्या त्रासाला कंटाळून स्पा मालक संतोष शेरकर यानेच हत्येची सुपारी दिली होती. शेरेकर यांचा वरळीतील सॉफ्ट टच स्पा आणि नालासोपारा येथील आरोपी फिरोज याचा स्पा वाघमारे याच्या तक्रारीमुळे बंद झाला होता. त्यामुळे फिरोजने शेरकरसोबत संपर्क साधत गुरु वाघमारेला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फिरोजने दिल्लीतील शाकिबला चार लाख रुपये देत हत्येचा कट रचला. तीन महिन्यांपासून गुरु वाघमारेला संपवण्याची तयारी सुरु होती.
दरम्यान, अनेकजण आपल्या जीवावर उठले आहेत याची वाघमारेला पूर्ण कल्पन होती. त्यामुळे ज्यांच्यापासून जीवाला धोका आहे अशांची नावे गुरु वाघमारे यांने मांडीवर गोंदवून घेतली होती. जर माझी हत्या झाली तर हे जबाबदार असतील, असेही त्याने टॅटूच्या स्वरुपात गोंदवून घेतलं होतं.
गुरू वाघमारे वरळीतील स्पाला नियमित भेट देत असे आणि तेथे काम करणाऱ्या लोकांशी त्यांची ओळख होती. काही दिवसांपूर्वीच वाघमारेचा वाढदिवस होता. मंगळवारी संध्याकाळी जेव्हा तो स्पामध्ये पोहचला तेव्हा त्याच्या 21 वर्षाच्या गर्लफ्रेंडने आणि इतर तीन मित्रांनी बर्थडे पार्टीचा प्लान केला. त्यानंतर ते पार्टीसाठी सायनजवळील एका बारमध्ये गेले. बारमध्ये रात्री 12.30 पर्यंत पार्टी केल्यानंतर ते पुन्हा स्पामध्ये आले. स्पामध्ये आल्यानंतर काही वेळाने तिघेही मित्र निघून गेले. मित्र गेल्यानंतर गुरू आणि त्याची मैत्रीण मात्र स्पामध्येच थांबले. वाघमारे हा स्पा मालकालाही ब्लॅकमेल करत असल्याचे पोलिसांनी उघड केले. जे त्याच्या हत्येचे प्रमुख कारण मानले जात आहे. सध्या आरोपींची चौकशी सुरू आहे.