रमेश औताडे, मुंबई
अधिकृत फेरीवाल्यांच्या (Hawkers) व पादच्याऱ्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने दोन दिवसापूर्वी सरकारची खरडपट्टी काढली. या पार्श्वभूमीवर अधिकृत फेरीवाले आक्रमक झाले असून, सरकारने जर दहा दिवसात योग्य ती भूमिका घेतली नाही तर आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडली तर आम्हाला जबाबदार धरू नये. असा इशारा अधिकृत फेरीवाल्यांनी सरकारला दिला आहे.
फेरीवाला हप्ता भर दिवस सर्वांसमोर घेणारे भाई त्या हप्त्याला फेरीवाला भिशी असे नाव देत वसुली करत आहेत. हा हप्ता काही सरकारी बाबूंच्या खिशात आपोआप जातो. या सर्व यंत्रणेमुळे न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकार फेरीवाल्यांच्या बाबत निर्णय न घेता बघ्याची भूमिका घेत आहे असे फेरीवाले बोलत आहेत.
अनधिकृत फेरीवाले यांच्यावर कारवाईसाठी व अधिकृत फेरीवाल्यांच्या न्याय मागण्यांसाठी न्यायालयात याचिका येत असतात. न्यायालय सरकारला आदेश देत असते. तरीही हा प्रश्न मार्गी लागत नाही. त्यामुळे सरकारने आता गंभीर होणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने दोन दिवसा पूर्वी एका न्याय निवड्यात सरकारवरला गंभीर होण्यास सांगितले आहे. तक्रार निवारणासाठी संबंधितांनी न्यायालयातच येऊन बसावे अशी पोलिस, महापालिका व संबंधित यंत्रणेची आणि अन्य प्राधिकरणांची इच्छा आहे का ? असा संतप्त सवालही उच्च न्यायालयाने दोन दिवसापूर्वी सरकारला केला आहे.
मंत्रालय, राज्यपालांच्या घरासमोर फेरीवाल्यांना ठाण मांडू द्याल का ? अशा शब्दांत न्यायालयाने यंत्रणांची खरडपट्टी काढली आहे. तरीही सरकार गंभीर नाही असा आरोप फेरीवाले व त्यांच्या संघटनेचे नेते करत आहेत. मतदार व निवडणुक कामी सर्व यंत्रणा कामाला लावणारे मतांच्या जोगव्यासाठी रात्रीचा दिवस करतात. मात्र अधिकृत व अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न तसेच फूटपाथ व पादचारी प्रश्न यावर अभ्यास करायला वेळ काढत नाहीत. न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया फेरीवाले देत आहेत.
काही पालिका अधिकारी काही पोलिस अधिकारी व काही फेरीवाले नेते व त्यांनी जोपासलेले फेरीवाला भिशी जमा करणारे गुंड या सर्व यंत्रणा मिळून सर्वसामान्य नागरीक, फेरीवाले व पादचारी यांना न्यायालयाची पायरी चढायला लावत आहेत. अशी खंत पादचारी व अधिकृत फेरीवाले व्यक्त करत आहेत.
अनधिकृत व अधिकृत फेरीवाले यांचा प्रश्न निकाली काढण्यास सरकारला सहज शक्य आहे. मात्र “हप्ते” या अडीच अक्षराभोवती फिरणारे राजकारण हा फेरीवाल्यांचा प्रश्न घोंगडे भिजत ठेवल्याप्रमाने भिजत ठेवत आहेत. अशी माहिती एका फेरीवाल्याने “भिशी गुंडाच्या” भीतीपोटी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.