ठाणे
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) कट्टर शिवसैनिक राजन विचारे (Rajan Vichare) यांचा पराभव झाल्यानंतर ठाणे (Thane) शहरातील शिवसेनेला (Shiv Sena) आणखी एक धक्का बसला आहे. ठाण्यामधील युवासेनेच्या (Yuvasena) पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर येत आहेड. राजन विचारे यांचे कट्टर समर्थक शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश करणार असून आज संध्याकाळी वर्षा बंगल्यावर पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाण्यामधील उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडणार अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) तोंडावर हा पक्षप्रवेश होत असल्यामुळे ह्याचे निवडणुकीवर काय परिणाम होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना संघटन बांधणीचे आव्हान असतानाच, ठाणे शहरातील युवा सेनेने नाराजी समोर येत सामूहिक राजीनाम्यांमुळे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना हादरा बसला आहे. राजीनामा देणारे युवा सेनेचे पदाधिकारी हे राजन विचारे यांचे कट्टर समर्थक आहेत. या पदाधिकाऱ्यांनी शिवेसना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्याचे निश्चित केलय.
ठाणे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अर्जुन डाभी, शहरअधिकारी किरण जाधव, बालकुमचे शिवसेना शाखाप्रमुख अभिषेक शिंदे, उपसमन्वयक दिपक कनोजिया, खोपटचे विभाग अधिकारी राज वर्मा या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनाम्याचे पत्र आदित्य ठाकरे यांना पाठवले आहे. युवा सेना स्थापन झाल्यापासून, गेली 15 वर्षांपासून युवा सेनेसोबत काम करत आहेत. दिवस-रात्र ठाणे शहरात युवकांचे संघटन प्रामाणिकपणे उभारले. शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो. वेळप्रसंगी विरोधकांना अंगावर घेतले. परंतु गेल्या 2 वर्षांपासून काही निवडक पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत गटबाजी चालू केली आहे. आमच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे आम्ही सामूहिकरित्या पदाचा राजीनामा देत आहे, असे राजीनामा पत्रात म्हटले.