ज्येष्ठ साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे (Father Francis Dibrito) आज दीर्घ आजाराने निधन झाले. हरित वसईच्या संरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे, सिद्धहस्त लेखक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ‘सुवार्ता’कार फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनाने राज्यावर शोककळा पसरली आहे. मृत्यू समयी ते 82 वर्षांचे होते. वसईमध्ये आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फादर दिब्रिटो मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी चार वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून फादर दिब्रिटो यांनी पर्यावरण रक्षणासाठी मोठी चळवळ उभारली होती. सुवार्ता या मासिकाद्वारे त्यांनी समाज प्रबोधनाचं मोठं काम केलं. 1983 ते 2007 या काळात फादर दिब्रिटो या मासिकाचे संपादक होते. वसईतील राजकारणाचे गुन्हेगारीकरणा विरोधातही त्यांनी मोठा लढा उभारला होता. धारशिव येथे झालेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.
अग्निवीर योजनेसंदर्भात मोदी सरकारची मोठी घोषणा
आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा, ओअॅसिसच्या शोधात, ख्रिस्ती सण आणि उत्सव, ख्रिस्ताची गोष्ट नाही मी एकला (आत्मकथन), संघर्षयात्रा ख्रिस्त भुमीची: इस्त्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास, सृजनाचा मळा, सृजनाचा मोहोर, तेजाची पाऊले अशी त्यांची साहित्य संपदा आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म 4 डिसेंबर 1942 रोजी वसई तालुक्यातील नंदाखाल या गावात झाला होती. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात बीए, धर्मशास्त्रात एमए पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. सन 1972 मध्ये त्यांनी कॅथलिक धर्मगुरू पदाची दीक्षा घेतली होती. पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्यांनी मोठं काम केलं. हरित वसईच्या माध्यमातून त्यांनी मोठी चळवळ उभी केली.