गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर राज्यात (Heavy Rain) अजूनही कायम आहे. हवामान विभागाने राज्यातील पुणे, सातारा, रायगड, पालघर, सांगली या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट आहे. पुणे, सांगलीत पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन गुरुवारी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पुण्यात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे आदेश काढले आहेत.
Heavy Rain पुणे, सांगलीत शाळा बंद
पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात येत्या काही तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ४० हजार क्यूसेक खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने रेड अलर्ट घोषित केल्यामुळे शाळा बंदचा निर्णय सांगली प्रशासनानेही घेतला आहे. राज्य सरकारचा अलमट्टी धरणाशी पाणी सोडण्याबाबतीत कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही. शिवाय अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कर्नाटक सरकारकडून कमी प्रमाणात करण्यात येत आहे,असा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे.तसेच राज्य सरकारने तातडीने अलमट्टी धरणातून पाणी साठा कमी करण्याबाबत कर्नाटक सरकारवर दबाव आणला नाही,तर यंदा देखील सांगलीला महापुराचा फटका बसेल, अशी भीती कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
Heavy Rain मुंबईत पावसाची संततधार
मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस सुरु आहे. कल्याण डोंबिवली पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे अनेक सखल भागात आणि रस्त्यावर पाणी साचण्याची घटना घडली आहे. मात्र अधूनमधून पावसाचा जोर कमी होत असल्याने पाण्याचा निचरा देखील होत आहे. बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसाने रात्री व आज पहाटे देखील आपला जोर कायम ठेवला आहे. कल्याण डोंबिवली परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
Heavy Rain पिंपरी-चिंचवडमध्ये रात्री विक्रमी पाऊस
पिंपरी चिंचवड शहराची आणि मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात रात्रीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळला आहे.गेल्या 12 तासांत तब्बल 374 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. धरणाच्या पाणी साठ्यात 12 तासांमध्ये पावसाने तुफान बॅटिंग केल्याने थेट 10 टक्के वाढ झाली आहे. बुधवारी सायंकाळी 5 वाजता धरणाचा पाणी साठा 57.70 टक्के इतका होता, तो आता 67.80 टक्के झाला आहे. गेली अनेक वर्षे एका रात्रीत इतका तुफान पाऊस बरसल्याची नोंद नव्हती.