पुणे
पुण्यात मुसळधार पाऊस (Pune Weather) सुरु आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हाहा:कार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत (Pune Heavy Rain) झाले आहे. पुण्यातील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रशासनाकडून कशाप्रकारे बचावकार्य सुरु आहे, याचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच आता नागरिकांच्या बचावासाठी आणि त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी भारतीय लष्कराची (Indian Army) तुकडी तैनात करण्यात आली आहे.
या पथकासोबत आपत्तीने प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी तसेच तत्पर आणि परिणामकारक मदतकार्यासाठी आवश्यक बचाव बोटी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा साधने आहेत. लष्कराच्या अतिरिक्त पथकांना सज्ज ठेवण्यात आले असून वेळ आलीच तर अगदी कमी वेळात ही पथके आवश्यकता असेल तेथे त्वरित पोहोचू शकतील.
भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडमधील अधिकारी नागरी प्रशासन तसेच इतर सरकारी संस्थांशी समन्वय साधत, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आज, 25 जुलै 2024 रोजी स्थानिक प्रशासनाकडून लष्कराच्या मदतीसाठी विनंती करण्यात आली. या विनंतीला प्रतिसाद देत लष्कराच्या कृती दलाला प्रभावित भागाकडे तातडीने पाठवण्यात आले.
एकूण 85 जणांचा समावेश असलेल्या या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी रेजिमेंट आणि लष्करी रुग्णालये तसेच इतर तज्ञ घटकांतील वैद्यकीय पथके सहभागी आहेत. लष्कराचे जवान बचाव आणि मदत कार्यात संपूर्णपणे सहभागी झाले आहेत. गरज लागली तर मदतीसाठी भारतीय हवाई दलाला देखील सज्ज राहण्यास सांगितले आहे.
या आपत्तीत नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी भारतीय सशस्त्र दले संपूर्णपणे जय्यत तयारीत आणि सुसज्ज आहेत. लष्कराच्या मदतीमुळे पूरग्रस्त भागातील लोकांना मोठी दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. नागरी प्रशासनाने नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.