मुंबई
राज्यात पावसाचा जोर वाढला असून काल दिवसभर अनेक जिल्ह्यांत मुसळधार (Pune Rains) पाऊस होत आहे. पुण्यात काल रात्रभर अतिमुसळधार पाऊस कोसळत होता. राज्याची राजधानी मुंबईतही पावसाने (Mumbai Rain) जोर धरला आहे. पुण्यात पावसाने जोर धरल्याने धरणांच्या (Heavy Rain) पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.तसेच नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू असून कल्याण, ठाणे आणि परिसरात पावसाच्या पाण्यामुळे तेथील नद्यांना पूर आला आहे. बदलापूरजवळील उल्हास नदीला पूर आला असून रस्तेही जलमय झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या कर्जत ते कल्याण वाहतूक बंद असून पुणे-मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
पुण्यात पावसामुळे आज जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. पालकमंत्री अजित पवार यांनीही पुण्यातील काही भागांत दौरा करुन पाहणी केली. तर, प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. त्यातच, मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस, मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस आणि पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस आज 25 जुलै रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. तर, उद्या सकाळी पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, पुणे-मुंबई व मुंबई-पुणे येथील प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे.
कल्याण मधील शिवाजीनगर परिसरामध्ये वालधुनीच्या कडेला असणाऱ्या 200 हून अधिक नागरिकांच्या घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरले आहे. येथील नागरिकांचे स्थलांतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने केले आहे. मात्र, संसार उध्वस्त झाल्याने नागरिक भयभीत झाल्याचं दिसून आलं.