रमेश तांबे, ओतूर
जुन्नर तालुक्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे चिल्हेवाडी धरणाच्या (Chilewadi Dam) पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, धरणातून मांडवी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून, मांडवी नदी दुथडी भरून वाहत आहे, मागील काही दिवसांपासून चिल्हेवाडी धरण क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसामुळे चिल्हेवाडी धरण ८१ टक्के भरले असून, धरणाच्या पाणीसाठ्यात गुरूवारी दि.२५ रोजी सकाळ पर्यंत एकूण ७४० दशलक्ष घनफुट पाणी साठा झाला असल्याची माहिती कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव चे उपविभागीय अधिकारी आर.जी.हांडे व शाखा अभियंता अविनाश शिरसाट यांनी दिली.
चिल्हेवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ६४९ दशलक्ष घनफूट इतका असून,मागील चोवीस तासात धरण क्षेत्रात ४२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.तसेच आज अखेर एकुण पाऊस ३०२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.धरण पाणीसाठ्याची लेवल ७३६.६ मीटर असून,धरणातील सांडव्यातून ३८१७ क्युसेक वेगाने मांडवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
चिल्हेवाडी धरणाची पाणी एकुण साठवण क्षमता ९६० दशलक्ष घनफुट इतकी आहे व उपयुक्त पाणीसाठा ८०३ दशलक्ष घनफुट असून,आज रोजी धरणात एकुण पाणीसाठा ७४० दशलक्ष घनफुट असून,उपयुक्त पाणीसाठा ६४९ दशलक्ष घनफुट इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाचे गेट बंद केल्यानंतर उपयुक्त साठा ८०३ दशलक्ष घनफूट पाणी आडल्यावर हे धरण पुर्ण क्षमतेने भरेल.गेल्या आठवड्यापासून धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने, झपाट्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
चिल्हेवाडी धरणातील पाणी येडगाव धरणात सोडल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी धरणाचे गेट बंद करण्यात येणार असल्याचे धरण विभागाच्या सुत्रांनी सांगीतले. चिल्हेवाडी या धरणाच्या पाण्यावर अवलंबुन असलेल्या नदीकाठच्या रोहोकडी,ओतूर या गावांतील बंधारे भरून, या पाण्यामुळे नदिकाठच्या गावांंना सिंचनाचा फायदा होणार आहे.चिल्हेवाडी धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे विहीरींंच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे.दरम्यान ओतूर आणि परिसरात संततधार पाऊस पडत असुन,येथील शेतकरी सुखावला आहे तरी देखिल शेतकरी अद्यापही चांगल्या धो- धो मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
चिल्हेवाडी धरणाचा बंद पाईपद्वारे सुरू असलेला कालवा चिल्हेवाडी धरणापासून ३९.८० कि.मी.लांबीचा कालवा असून त्याद्वारे आंबेगव्हाण,रोहोकडी,ओतूर,डुंबरवाडी,खामुडी,गायमुखवाडी,पिंपरी पेंढार,आळे,राजुरी,बेल्हे बांगरवाडी परिसरातील एकुण एकोणीस गावातील ६३७२ हेक्टर क्षेत्राला भविष्यात सिंचनाचा फायदा होणार आहे.