नागपूर
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना खोट्या प्रकरणांत तुरुंगात डांबण्याचा डाव होता. पण तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी यासंबंधीच्या एका प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यामुळे हे दोघे वाचले. नंतर या प्रकरणांत देशमुखांवरच तुरुंगात जाण्याची वेळ आली, असा खळबळजनक दावा अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav) यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून, देशमुखांना प्रतिज्ञापत्र पाठवणारा नेते कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांमुळे सध्या खळबळ माजली आहे. अजित पवारांनी पार्थ पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बोलावून गुटका व्यवसायिकांकडून दर महिन्याला कोट्यवधींची कमाई करून द्या, अशी मागणी केल्याचं वक्तव्य तपास यंत्रणांकडे द्या, असं सांगण्यासाठी अनिल देशमुखांवर काही लोकांकडून सातत्यानं दबाव टाकला जात होता. तसेच, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठीही अनिल देशमुख यांवर कसा दबाव होता, असे धक्कादायक दावे श्याम मानव यांनी नागपुरात केले आहेत.
अनिल देशमुखानी तपास यंत्रणांपुढे चौकशीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजित पवार आणि पार्थ पवार यांची नावं विविध खोट्या प्रकरणात घेतली, तर तुम्हाला ईडीच्या प्रकरणात सोडून देऊ, अशी थेट ऑफरच अनिल देशमुखांना देण्यात आल्याचा धक्कादायक दावाही श्याम मानव यांनी केला आहे.
श्याम मानव यांनी सांगितलं की, अनिल देशमुख गृहमंत्री असताना काही लोकांकडून सांगण्यात आलं होतं की, तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून स्वतःची सोडवणूक करून घ्यायची असेल, तर तुम्ही 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात उद्धव ठाकरे यांचं नाव घ्यावं. आदित्य ठाकरे यांचं नाव दिशा सालियन बलात्कार आणि हत्या प्रकरणात घ्यावं, अनिल परब यांचंही नाव त्यांच्याशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांच्या प्रकरणात घ्यावं. मात्र, अनिल देशमुख यांनी तसं केलं नाही.