4.1 C
New York

Manoj Jarange : मी इथे झोपून कशाला वेळ घालू? त्यापेक्षा…

Published:

जालना

मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी त्यांचे उपोषण अचानक स्थगित केले आहे. आपण सलाईन लावून उपोषण करु शकत नाही, असे म्हणत त्यांनी हे उपोषण स्थगित केल्याची माहिती आहे. सरकारने सगेसोयरे परिपत्रकाचा अध्यादेश काढावा यासाठी जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून उपोषण सुरु केले होते. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस होता. पण तब्येत ढासळल्याने डॉक्टराच्या सल्ल्याने आणि समाजाच्या आग्रहामुळे आंदोलन स्थगित केले आहे.

कोणतेही मंत्री आले नाहीत. त्यांना वाटते की कोणत्या तोंडाने जावे? कारण त्यांनी मराठा समाजाला दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. उपोषण करायला मी तयार आहे, पण असले बेगडी उपोषण नको. सलाईन लावून उपोषण होत नाही. हा फक्त वेळकाढूपणा झाला. आता समाजाचाही प्रचंड दबाव आहे. वेळ लागला तरी चालेल पण तुम्हीही आम्हाला हवे आहात, असे समाज म्हणत आहे. त्यामुळे उपोषण थांबवत आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

आता एक-दोन दिवस उपचार घेऊन राज्याचा दौरा सुरु करेन. मी इथे झोपून कशाला वेळ घालू? त्यापेक्षा राज्यात फिरुन सभा, रॅली करता येईल. विधानसभेसाठी तयारी करता येईल. कोणी भेटायला आला नाही म्हणून मला फरक पडत नाही. मी मराठा आहे, जातीवंत मराठा आहे. खानदानी आहे. माझ्या शक्तीच्या बळावर मी आंदोलन करतो. मी न्याय हिसकावून आणतो. सरकारला तोंड दाखवायला जागा नाही, त्यामुळे ते तोंड दाखवत नाहीत, असाही हल्लाबोल जरांगे पाटील यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img