19.7 C
New York

Otur Bus Stand : ओतूर बस स्थानकात साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे नागरिक त्रस्त

Published:

रमेश तांबे, ओतूर

ओतूर बस स्थानक (Otur Bus Stand) हे नगर- कल्याण महामार्गावरील मोठे बस स्थानक असून हे बस स्थानक दिवसेंदिवस विविध समस्यांनी ग्रासले आहे, या बस स्थानकात पावसामुळे मोठ-मोठे खड्डे पडले असून खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे,यामुळे बस स्थानकातून दैनंदिन ये- जा करणारे वाहन चालक व प्रवासी त्रस्त झाले असून, प्रवाशांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ओतूर बस स्थानक हे नगर- कल्याण महामार्गावरील बस स्थानक असून, या बस स्थानकातून नगर मार्गे कल्याण व कल्याण ओतूर मार्गे अहमदनगर अशी दैनंदिन सुमारे चारशे एसटी गाड्यांची ये-जा असते 

ओतूर बस स्थानकात मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्याची समस्या निर्माण झालीअसून याकडे प्रशासन, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिक व प्रवाशांनी केला आहे. ओतूर बस स्थानकामध्ये पावसाळ्यात दरवर्षी पाणी साचण्याची समस्या ही नित्याचीच झाली असून ,या खड्ड्यांमुळे येणाऱ्या जाणाऱ्या खाजगी वाहने व एसटी गाड्यांची चाके खड्ड्यात जाऊन डबक्यात साचलेले पाणी आजूबाजूच्या इतर वाहनांवर तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर उडत असल्याचे चित्र पहावयास मिळाते.ओतूर बस स्थानकाच्या डांबरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपूर्वी झाले असून, डांबरीकरण करताना बसस्थानकातील नैसर्गिक पाण्याचा निचरा होण्यासाठी परिवहन महामंडळाने ठोस उपाययोजना केल्या नसल्याने, ही समस्या निर्माण झाली आहे.. दरवर्षी पावसाळ्यात बस स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे या ठिकाणावरून जाणाऱ्या येणाऱ्या एसटी बस तसेच दुचाकीस्वार, खाजगी वाहनचालक व प्रवाशांना याचा त्रास होत आहे.पावसाळा सुरू झाला की, बस स्थानकात पाण्याचे मोठे डबके साचत असल्याने, बस स्थानकात  वाहनचालकांना वाट शोधत,वाहन चालवावे लागते.दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणच्या खड्ड्यात पाणी साचून,खड्डे अधिकच वाढत आहेत.बस स्थानकात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, साचलेल्या डब्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी वाढली आहे.

या बस स्थानकात खाजगी वाहने पार्किंग करत असल्याने याचा त्रास येणाऱ्या जाणाऱ्या एसटी चालक आणि प्रवाशांना होत आहे. याबाबत ओतूर बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रण सखाराम मिलखे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ब्राह्मणवाडा चौक तसेच ओतूर बस स्थानकालगतचे व्यवसायिक, निवासी इमारत या सर्वांचे पाणी बस स्थानकात येऊन साचत आहे, हे पाणी इतरत्र काढून देण्यासाठी ओतूर ग्रामपंचायत तसेच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क  केला असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img