टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन क्रिकेट वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. २७ जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकेच्या धरतीवर तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. तीन सामन्यांची वन डे मालिका या मालिकेनंतर खेळवली जाईल. टीम इंडियाचा नवनिर्वाचित प्रशिक्षक गौतम गंभीरची प्रशिक्षक म्हणून ही पहिलीच परीक्षा आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यापूर्वी गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध बांबीवर प्रकाश टाकला. यावेळी आगरकरने सूर्याला कर्णधार बनवल्याचे कारण सांगताना हार्दिकच्या फिटनेसबद्दल भाष्य केले.
अजित आगरकर म्हणाला की, सूर्यकुमार यादव कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार असल्याने त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. तो ट्वेंटी-२० मधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. कर्णधारसर्व फॉरमॅट खेळू शकेल असा असावा असे सर्वांनाच वाटते. हार्दिक पांड्याच्या फिटनेसच्या समस्यामुळे त्याला वगळण्यात आले. शुबमन गिलच्या भवितव्यावर बोलताना गंभीरने मोठे विधान केले. खरे तर मागील काही कालावधीपासून शुबमन गिल संघर्ष करत आहे. त्यामुळे त्याला संघात जागा मिळवणे कठीण झाले. पण संधी मिळताच त्याने त्यानंतर साजेशी खेळी केली. शुबमन गिलचे भवितव्य काय त्यामुळे हा प्रश्न उद्भवतो. यावर गंभीर म्हणाला की,भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये गिल खेळेल, तर बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेतून मोहम्मद शमी पुनरागमन करेल.
गंभीरने कोहलीबद्दलच्या प्रश्नावर व्यक्त होताना संतप्त प्रतिक्रिया दिली. त्याचा रोख नेटकऱ्यांवर असल्याचे पाहायला मिळाले. माझे आणि विराट कोहली खूप चांगले संबंध होते. पण, केवळ टीआरपीसाठी काहीही चालवले गेले. मी प्रशिक्षक झाल्यानंतर विराटसोबत चर्चा केली. माझे त्याच्याशी खूप चांगले संबंध होते. जागतिक दर्जाचा तो खेळाडू आहे, आम्ही दोघे आमच्या संघासाठी सामने जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करू, असे गौतम गंभीरने म्हटले.