मुंबई
पुण्यात रविवारी भाजपचे (BJP) महाअधिवेशन पार पडलं. या अधिवेशनातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) विरोधकांनी खोटा नेरेटिव्ह पसरवला. मात्र, आम्ही विधानसपरिषदेत त्यांच्या फुग्याला टाचणी लावली. आमचा एकही आमदार फुटला नाही. पण त्यांचे 20 आमदार फोडले, असा चिमटा फडणवीसांनी काढला. त्यांच्या या विधानाचा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चांगलाच समाचार घेतला.
संजय राऊत म्हणाले, राज्यात फोडाफोडीचे मोठे राजकारण सुरू आहे. पैसा फेको तमाशा देखो असा सर्व खेळ सुरू आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे 20 आमदार फोडले. हे आमदार त्यांनी चिंचोके देऊन फोडले का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीचे जे आमदार फुटले त्यांना प्रत्येकी 50 कोटी रुपये वाटण्यात आले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना तातडीने अटक करा. त्यांच्यावर ईडी-सीबीआयची चौकशी लावा. तुम्हाला भ्रष्टाचार नकोय तर भ्रष्टाचारी गृहमंत्री कशाला पाहिजेत असा संताप देखील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या संदर्भात औरंगजेब फॅन्स क्लब असं वारंवार अमित शहा बरळत आहेत. पण आम्ही जिना फॅन्स क्लब मध्ये सामिल नाही. पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिनाच्या कबरीवर फुलं उधळणारे आम्ही नाहीत. पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांचा केक कापण्यात आणि खाण्यात आम्हाला कधीही इंटरेस्ट नव्हता. या देशातील प्रखर राष्ट्रवादी मुसलमानांची बाजू मांडणं यात काही चुकीचं नाही. या देशातील अनेक संघर्षाच्या काळात मुस्लिमांनी देखील बलिदान केलं आहे.
संजय राऊत म्हणाले, पण महाराष्ट्रातील पराभव अमित शहांच्या जिव्हारी लागला आहे. महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारात देखील त्यांनी शरद पवारांवर आरोप केले. तसंच उद्धव ठाकरेंना औरंगजेब फॅन्स क्लबचे प्रमुख असं म्हटलं, पण तरीही इथल्या जनतेनं त्यांचा दारुण पराभव केला. गुजरातच्या व्यापाऱ्यांनी आम्ही महाराष्ट्र लुटू देणार नाही हा संदेश लोकसभा निवडणुकीच्या निमित्त अमित शाहांना राज्यातील जनतेनं दिला आहे, त्याचा आक्रोश ते आत्ता करत आहेत.
संजय राऊत म्हणाले, गृहमंत्री अमित शहा जर सच्चे असतील, तर ते देवेंद्र फडणवीस यांना अटक करतील. राज्याचे गृहमंत्री गर्वाने सांगतात की, आम्ही 20 आमदार फोडले. फुकट फोडले का? की दहीभात देऊन फोडले? आमदार फोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पैसे आणले कुठून? याची अमित शहा चौकशी करणार आहात का? जर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची चौकशी केली, तर तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आहे. अमित शहा गृहमंत्री आहेत हे सांगायला आम्हाला लाज वाटते. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असून ठोकून काढा अशी भाषा वापरतात. त्यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा. आगामी विधानसभा निवडणुकीत नागपुरातून त्यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.