कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, कर्जत, ठाणे या ठिकाणी राहणाऱ्या प्रवाशांना दररोज मध्य रेल्वेच्या सावळ्या (Central Railway) गोंधळाचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसात मध्य रेल्वेच्या समस्या वाढतच जातात. आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागणार आहे. डोंबिवली आणि कल्याणदरम्यान एका एक्सप्रेस गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे घरी परतणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
Central Railway एक्सप्रेस आणि लोकल गाड्यांचा खोळंबा
मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकादरम्यान एक्सप्रेस गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. लोकमान्य टिळक टर्मिन्स या ठिकाणाहून निघालेल्या एका एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये मोठा बिघाड झाला आहे. त्यामुळे ही एक्सप्रेस ठाकुर्ली स्थानकात थांबवण्यात आली आहे. यामुळे या गाडीच्या मागून येणाऱ्या अनेक एक्सप्रेस आणि लोकल गाड्यांचा खोळंबा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही एक्सप्रेस गाडी लोकमान्य टिळक टर्मिन्सवरुन रवाना झाली होती. त्याच वेळी अचानक या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. याबद्दलची माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने ठाकुर्लीच्या दिशेने नवीन इंजिन रवाना केले आहे. हे नवीन इंजिन त्या गाडीला लावले जाणार आहे. त्यानंतर ही एक्सप्रेस गाडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मुंबईत पुढील 24 तासांमध्ये अतिवृष्टीची शक्यता
Central Railway लोकल वाहतूक उशिराने सुरु
मात्र या बिघाडामुळे डोंबिवली दरम्यान लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या डोंबिवली रेल्वे स्थानकात अनेक गाड्या एका पाठोपाठ एक उभ्या असल्याचे दिसत आहे. यामुळे अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने सुरु आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसत आहे.
Central Railway सकाळी सिग्नल यंत्रणेत बिघाड
दरम्यान कल्याण डोंबिवली शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कायमच मध्य रेल्वे ही उशिराने धावत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. आजही मुसळधार पावसाचा फटका लोकल वाहतुकीला बसला असून लोकलचे वेळापत्रक कोलमडले. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याणच्या पुढे असलेल्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कसारा, कर्जतकडे जाणारी धिम्या व जलद मार्गावरील लोकल सेवा पूर्ण विस्कळीत झाली. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने दिवा, कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, टिटवाळा रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी उसळली. अनेक लोकल या अनियमित वेळेत धावत होत्या. रेल्वेकडून फक्त सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचे माहिती दिली जात होती. यामुळे प्रवाशी संतप्त झाले होते.