शंकर जाधव, डोंबिवली
पावसाळ्यामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या शेतात, मळ्यामध्ये उगवतात. या रानभाज्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय हितकारक असतात. या खाल्ल्याने वर्षभर बरेचसे आजार होत नाही असे म्हटले जाते. यासाठी रानभाज्यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून (Dombivli) लोकमान्य गुरुकुल मध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका अर्चना पावडे यांनी सांगितले. शाळेत भरवीलेल्या या प्रदर्शनात पालकवर्गानी गर्दी केली होती.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या आजी स्मिता कोकिरडे, रेवती भागवत व अंजली खेर व लोकमान्य गुरुकुलाच्या मुख्याध्यापिका अर्चना पावडे व उपक्रम प्रमुख व्यंकटेश प्रभुदेसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. माध्यमिक मधील मोठ्या विद्यार्थ्यांना घेऊन शेतावर बांधावर जाऊन कुरडू, अंबाडी, केवळा, टाकळा अशा भाज्या दाखवून त्या तोडून आणल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी त्या सर्व भाज्या निवडल्या त्याच्या जुड्या तयार केल्या व त्या विकण्यात आल्या. यामध्ये एकरा, कर्टुले, आळूची पाने, शेवग्याचा पाला, फडशी अशा विविध भाज्या विद्यार्थ्यांना दाखवण्यात आल्या व पालकांना या भाज्या बघण्यासाठी व खरेदी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
पालक उत्स्फूर्तपणे प्रदर्शन बघण्यासाठी आले होते व भाज्याही विकत घेत होते. आणलेल्या सर्व भाज्या विकल्या गेल्या. यातून विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख झाली व भाजी विक्री कशी करायची याचा अनुभव मिळाला, गणितातील गुणाकार बेरजा कशा करायच्या हे कळले व यातून व्यवहार ज्ञानही विद्यार्थ्यांना आले.