पुणे
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज पुण्यात भाजपच्या (BJP) महाराष्ट्र अधिवेशनाचा कार्यक्रमात केली. यालाच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, अमित शहा यांनी पुण्यामध्ये येऊन जी मुक्ताफळे उधळली त्यावरून दोन मुद्दे नक्कीच स्पष्ट झाले. त्यातला पहिला भाग म्हणजे आजही अमित शहा यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपलं भाषण चुरचुरीत करण्यासाठी जाणीवपूर्वक उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही आणि संपवताही येत नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, तुमच्या समोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचं आहे.
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, ज्या पद्धतीची अत्यंत खालच्या पातळीची भाषा आज तुम्ही पुण्यामध्ये केली, त्यावरून तुम्ही हे सप्रमाण सिद्ध केले की, लोकसभेत तुमच्या पक्षाचे खासदार रमेश बिधुरी यांनी जी सवंग भाषा केली होती, त्याच्याही पेक्षा अधिक निम्नतम-स्तर अमित शहा तुम्ही आज पुण्यामध्ये येऊन गाठला आहे.