मुंबई
मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Yojana) टीका करत आता लाडकी मेहुणा योजना आणतील, असं म्हटलं होतं. यालाच आता भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जरांगेंना आता आपली पब्लिसिटी महत्वाची वाटतेय. गोरगरीब महिलांना, भाऊ-बहिणींना फायदा होतोय. त्यापेक्षा मी मोठा, मीच रोज प्रसिद्धीच्या झोतात राहिले पाहिजे म्हणून लाडकी बहीण आणि भाऊ योजना गर्दी डायव्हर्ट करण्यासाठी केल्याचा फुटकळ आरोप ते करत आहेत.
प्रवीण दरेकर म्हणाले की, या योजनेतून मराठा समाजातील गरीब महिलांनाही मदत होणार आहे. मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. उपेक्षित, वंचित सर्व गरीब घटकांना न्याय मिळणारी ही योजना आहे. पण आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागलात सर्व खड्ड्यात गेले, रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे. मी करतो तेच गरिबांचे कल्याण. यातून जरांगे यांनी बाहेर यायला हवं.”
प्रवीण दरेकर म्हणाले की, जरांगे तुम्हाला कल्पना नसेल मराठा समाजातील मुलांच्या नोकऱ्यांसाठी स्वयंरोजगारासाठी सतत रचनात्मक काम करणारे आम्ही आहोत. मराठा समाजाला भावनिक करून मलाच नेता बनायचे आहे. तुम्ही तुमची वक्तव्ये तपासा. तुमचा भंपकपणा आम्ही आता उघडा करणार आहोत. मी मराठा समाजाच्या विचारवंतांना एकत्रित करणार आहे. गरीब मराठा समाजाच्या कल्याणासाठी सरकारशी समन्वय साधून नेमकं काय हवेय ते द्यायचेय. कारण जरांगेंवर प्रेम केले पाठबळ दिले पण त्यांच्या डोक्यात राजकारणाचे भूत बसलेय ते उतरवावे लागेल ते आम्ही निश्चितपणे करू. त्याचे अभियान सुरू करू.