4 C
New York

Dharmaveer 2 : धर्मवीर-2 ट्रेलर लाँचवेळी फडणवीसांचे सूचक विधान

Published:

मुंबई

चित्रपटाच्या घोषणेपासूनच उत्सुकता निर्माण केलेल्या ‘धर्मवीर 2’ चित्रपटाचा (Dharmaveer 2) दमदार ट्रेलर नुकताच लाँच (Trailer Launch) करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुप्रसिद्ध बॉलिवुडस्टार सलमान खान, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगांवकर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर कलाकारांची मांदियाळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती. दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपण देखील एक चित्रपट काढणार असल्याचं म्हटलं आहे.

गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट मोठ्या पडद्यावर आणल्याने गुरुपौर्णिमा आजच साजरी झाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. “धर्मवीर – २” या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर आज मुंबईत लाँच करण्यात आला. साहील मोशन आर्ट्सचे मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी “धर्मवीर – २” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी उचलली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ट्रेलर लाँच करण्यात आला.

२०२२ ला “धर्मवीर” चित्रपटाचा पहिला भाग आला जो सुपरहिट झाला होता. दिघे साहेबांचे कार्य एका भागात दाखवणे शक्य नव्हते. दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल नाही तर त्या पावलांवर जीव ओवाळून टाकत आम्ही सारे आज काम करतो आहे. या चित्रपटात एक डायलॉग आहे “कार्यकर्त्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो” कारण नेत्याने लोकांच्या सुख- दुःखात, अडी-अडचणीत त्यांच्यासोबत उभे राहावे. प्रसाद ओक यांनी साकारलेली भूमिका अप्रतिम आहे, जी साकारणे तेवढे सोप्पे नाही कारण त्यांचा दिघे साहेबांसोबत तसा कधी भेटण्याचा संबंध आला नाही. मागच्या भागापेक्षा या भागात माझी भूमिका साकारलेले क्षितीश दाते यांनी छान काम केले आहे. पहिला सिनेमा जसा यशस्वी झाला त्यापेक्षाही हा सिनेमा जास्त यशस्वी होईल अशा शुभेच्छा मी संपूर्ण टिमला शुभेच्छा देतो असे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

तर गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला दिघे साहेबांच्या आयुष्यावर आधारित “धर्मवीर – २” या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. “हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही” ही चित्रपटाची टॅगलाईन जरी असली तरी शिंदेसाहेब असो किंवा आम्ही सर्व असू आमच्या जीवनाची टॅगलाईन सुद्धा हीच आहे. दिघे साहेबांच्या शिकवणी प्रमाणेच शिंदे साहेबांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्राची धुरा समर्थपणे सांभाळली आहे निश्चितच धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि स्व.हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातून आशिर्वाद देत असतील कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती. मलाही एकदा सिनेमा काढायचा आहे पण अजुन थोडा वेळ आहे. कारण मी जेव्हा सिनेमा काढेन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटतील आणि खरा चेहरा बाहेर येईल असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.सिनेमाचा ट्रेलर पाहून आता हा सिनेमा पाहण्यासाठी मी उत्सुक असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले.

तर धर्मवीर -2 या सिनेमाच्या हिंदी ट्रेलरचे लौंचिंग अभिनेता सलमान खान यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी गेल्यावेळी मी या सिनेमाच्या पहिल्या भागाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित होतो. तेव्हा तो सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता आता या सिनेमाचा दुसरा भाग रिलीज होतोय हा सिनेमाही ब्लॉकबस्टर ठरावा आशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

“धर्मवीर – २” चित्रपटाची टॅगलाइन ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट’ असल्यानं आता या सिनेमातून नक्की काय दाखवलं जाणार याची उत्कंठा आता अधिकच वाढली आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओक पुन्हा एकदा आनंद दिघे यांच्या भूमिकेत दिसेल तर अभिनेता क्षितिज दाते हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसेल. याशिवाय मकरंद पाध्ये, मंगेश देसाई, आरोह वेलणकर, रमेश परदेशी, श्वेता शिंदे यांच्यासह अनेक कलाकार “धर्मवीर – २” या सिनेमात काम करताना दिसतील. येत्या ९ ऑगस्टला एकाच वेळी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये हा सिनेमा एकाचवेळी प्रदर्शित केला जाणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img