पुणे
स्वत:ला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वारसदार म्हणवून घेणारे आता औरंगजेब (Aurangzeb) फॅन क्लबचे नेते झाले आहेत, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केला. ते भारतीय जनता पार्टीच्या (BJP) बालेवाडीतील अधिवेशनात बोलत होते. यावेळी बोलतांना त्यांनी शरद पवारांवरही (Sharad Pawar) टीकास्त्र डागलं.
अमित शहा म्हणाले की, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तृष्टीकरणाच्या ऐवजी सर्वांना न्याय देण्याचं काम करत देशाच्या संरक्षणाला सुनिश्चित केलं आहे. आतंकवादला मुळासकट फेकून टाकण्यासाठी निर्णय घेतले आहेत. मी त्याचा साक्षीदार आहे. देशाच्या सुरक्षेला औरंगजेब फॅन क्लब सुनिश्चित करु शकत नाही. भाजप (BJP) करु शकते. औरंगजेब फॅन क्लब कोण आहे? आघाडीवाले आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत, श्रीमान उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेता बनले असा घणाघात अमित शाह यांनी केला.
अमित शहा म्हणाले की, स्वत:ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारस म्हणवणारे उद्धव ठाकरे कसाबला बिरयानी खाऊ घालणाऱ्या लोकांसोबत बसले आहेत. उद्धवजी याकूब सोडवण्याची मागणी करणाऱ्या लोकांसोबत तुम्ही बसला आहात. झाकीर नाईकच्या समर्थकांच्या मांडीवर तुम्ही बसला आहात. संभाजीनगरचा विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर तुम्ही बसला आहात, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. हा औरंजेब फॅनक्लब महाराष्ट्र आणि देशाला सुरक्षा देऊ शकते का?”, असा सवाल अमित शाह यांनी केला. “देश आणि महाराष्ट्राला सुरक्षा ही केवळ भाजप देऊ शकते”, असा दावा अमित शाह यांनी केला.
अमित शहा म्हणाले की, महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या प्रचारात धावताना, घाम गाळताना, निकालासाठी प्रत्येक क्षणी झगडताना आपण पाहिले आहे. भाजपला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याने अतोनात परिश्रम घेतले, हे सांगण्यासाठी मी आज आलो आहे.
अमित शहा म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे. खोटे कसे पसरवले जात आहे, सध्या एक नोटीफिकेशन काढलं आहे, तारीख नवीन आहे निर्णय जुनाच आहे. मी देखील चकीत झालो. मी पियुष गोयल यांना फोन केला, त्यांनी सांगितलं हा निर्णय आपला नाही शरद पवार यांचा आहे. दूधाचे पावडर आयात करण्याचं सर्क्युलर ते (शरद पवार) काढून गेले आहेत, पण मोदी सरकारने दहा वर्षात एक किलो देखील दूध पावडर आयात केलं नाही. आणि पुढील पाच वर्षात देखील एक ग्रॅम देखील दुध पावडर आयत केलं जाणार नाही. हे भ्रम पसरवून निवडणूक जिंकू इच्छित आहेत, असेही अमित शहा म्हणाले.
अमित शहा म्हणाले की, हे भ्रष्टाचारावर बोलत आहेत, भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा सरदार भारताच्या राजकारणात कोण असेल तर ते शरद पवार आहेत, याबद्दल माझ्या मनात कसलीच शंका नाही. तुम्ही आमच्यावर काय आरोप करताय? देशातली कोणत्याही सरकारच्या काळात भ्रष्टाचाराला संस्थात्मक पद्धतीने करण्याचे काम कोणी केलं असेल तर ते शरद पवार तुम्ही केलं आहे. मी ‘डंके की चोट’ पर हे सांगतो. तुम्ही आमच्यावर आरोप करत आहात. तुमचं खोटं इथं चालणार नाही, घरोघरी जावून या खोट्याबद्दल माहिती द्यायची आहे असेही शहा यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
अमित शहा म्हणाले की, बंधू आणि बघिणींनो मी नेहमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेत आलो आहे. मी अभ्यासाच्या आधारावर सांगू शकतो की, बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान जितका काँग्रेसने केला आहे तितका इंग्रजांनी सुद्धा केला नव्हता”, असा आरोप अमित शाह यांनी केला. “ही गोष्ट आपल्याला घरोघरी जावून करायचं आहे. बाबासाहेबांशी जोडलेले 5 तीर्थ बनवण्याचं काम भाजप पक्षाने केलं. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार काँग्रेस पक्ष असताना मिळाला नाही. नरेंद्र मोदी सरकारने संविधान दिवस साजरा करायला सुरुवात केली. बाबासाहेबांच्या आठवणीत दिल्लीतही त्यांचं भव्य स्मारक बनवण्याचं काम सुरु आहे”, अशी माहिती अमित शाह यांनी दिली.
अमित शहा म्हणाले की, जे महाराष्ट्राच्या विकासावर बोलत आहेत, आज मी शरद पवार यांना विचारतो, दहा वर्ष महाराष्ट्रात तुमचे सरकार होते. केंद्रात देखील तुमचे सरकार होते तुम्ही महाराष्ट्राला काय दिलं? हिशोब द्या? खोट्या आश्वासनाशिवाय काही दिलं नाही. युपीए सरकारच्या काळात महाराष्ट्राला फक्त एक लाख ९१ हजार कोटी मिळाले होते. नरेंद्र मोदींनी दहा वर्षात १० लाख पाच हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आहेत. पवार साहेब हिशोबावर विश्वास नसेल तर पुण्यातील कोणताही चौक निवडा आमचे मुरलीधर मोहोळ हिशोब घेऊन उभे राहतील असेही अमित शहा येथे म्हणाले. त्यांनी पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरसाठी काही केलं नाही. या चार शहरांचा विकास मोदी सरकारने केला असेही शहा म्हणाले.