रमेश औताडे, मुंबई
पंढरपुरात आषाढी वारीच्या वाटेवर जपान वरून आयात केलेली माझी कार मराठा आरक्षण आंदोलनाचे योध्ये मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आदेशावरून जाळली नाही अशी मला खात्री आहे. त्यांचे स्टंट करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनीच जाळली असावी असा आरोप ह भ प अजय बारस्कर महाराज (Ajay Baraskar) यांनी शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
“चहा पेक्षा किटली गरम” अशी अवस्था जरांगे पाटील यांच्या काही स्टंट कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यांनी माझी कार जाळली असावी. पोलिसांनी त्यांना तपासाअंती अटक करून मला न्याय द्यावा. तसेच मला धमक्या देणाऱ्यांची नावे मी पोलिसांना दिली आहेत याचीही चौकशी करावी अशी मागणी बारस्कर यांनी यावेळी केली.
माझी पत्नी आई मुलगा मला आज सकाळी म्हणाले, पत्रकार परिषद व जरांगे पाटील सर्व सोडून द्या आता , तरीही मी माझ्यावरील आरोप व आरक्षण लढाई साठी आता माघार घेणार नाही. जोपर्यंत माझ्यावरील सर्व आरोप जरांगे पाटील माघारी घेत नाहीत व चुकलो म्हणत नाहीत तोपर्यंत न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार असल्याचे बारस्कर म्हणाले.
मराठवाड्यातील मराठा समाजाला शिक्षण व रोजगार मिळावा यासाठी कायद्याने जो काही न्याय मिळेल त्यासाठी मी उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेट घेणार आहे. नवी मुंबई वाशी येथून जरांगे पाटील यांनी माघार घेतली नसती तर सरकारने गंभीरपणे या विषयावर निर्णय दिला असता. आंदोलनकर्त्यांनी ट्रॅक्टर भरून रेशन आणले होते. महिनाभर आझाद मैदानात आंदोलन सुरू ठेवून आरक्षण घेऊनच जायचे होते. मग वाशी मधून माघार का घेतली ? असा सवाल बारस्कर यांनी यावेळी केला