मुंबई
मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर आरोप केल्यानंतर प्रसिद्धीस आलेले अजय महाराज (Ajay Baraskar) बारसकर यांच्या गाडीला पंढरपूर मध्ये जाळण्यात आले होते. या घटनेनंतर आज अजय महाराज बारसकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. फडणवीस यांची भेट झाल्याशिवाय आंदोलनावरून उठणार नाही अशी भूमिका अजय महाराज बारसकर यांनी घेतली आहे.
राज्यातील आरक्षणाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही, दुसरीकडे उपोषणकर्ते मनोज जरांगे हे सगे-सोयरे आणि ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. तर, शासनस्तरावर सगेसोयरेसंदर्भाने लवकरच अंमलबजावणी होईल, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, आरक्षणाचा हा गुंता राज्यातील सर्वात जटील प्रश्न बनला आहे. त्यातच, काही महिन्यांपूर्वी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करणारे अजय महाराज बारस्कर यांची गाडी जाळण्यात आल्यानंतर आता बारस्कर आक्रमक झाले असून ते थेट सागर बंगल्यावर पोहोचले आहेत.
बारस्कर यांनी पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर आपली MH 12 BP / 2001 ही टोयाटो कंपनीची कार भाविकांच्या निवासासाठी उभारलेल्या 65 एकरवरील भक्तिसागर पार्कमध्ये पार्क केली होती. अजय महाराज बारस्कर स्नान आणि प्रदक्षिणेसाठी गेले होते. त्यावेळी, एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली होती. त्यानंतर, आज अजय महाराज बारस्कर हे थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचल्याचं दिसून आलं. बारस्कर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या मांडून बसले होते. मात्र, त्यांना याठिकाणी आंदोलनाची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे