3.8 C
New York

Sharad Pawar Group : शरद पवार गटाच्या वतीने महायुतीच्या काळ्या कारनाम्यांचा फुगा फोडला

Published:

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar Group) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज पक्षाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद घेत महायुती (MahaYuti) सरकारच्या काळातील काळ्या कारनाम्यांचा फुगा फोडला तसेच’ माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र’ या कॅम्पेनची लाँचिंगही केली. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे देखील उपस्थित होते.

याबाबत पत्रकार परिषदेत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, भाजप प्रणित युती सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यापासून राज्य मागे पडत चाललेले आहे. महाराष्ट्रावर ७ लाख ८० हजार कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा आहे. त्यात यावर्षी पुन्हा १ लाख १० हजार कोटींचे आणखी कर्ज काढण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक माणसावर सुमारे ६५- ७० हजार रुपये कर्ज होईल.

सरकारची आर्थिक परिस्थिती दयनीय झाली आहे असा आरोप करताना सर्वसाधारणपणे राजकोषिय तूट ही सकल उत्पन्नाच्या ३ टक्क्यांच्या आत असली पाहिजे. पण या सरकारने यावर्षी दोन अर्थसंकल्प आणि एक पुरवणी मागणी मांडली. राजकोषिय तूट ४.३ टक्क्यांवर पोहचली आहे. राज्याच्या विकास वाढीचा दर कमी झालेला आहे. आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीत २.६ टक्क्यांची घसरण झालेली आहे. याचाच अर्थ महाराष्ट्र सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष नाही. पहिल्या दोन-तीन क्रमांकावर असलेले आपले राज्य आता अकराव्या स्थानावर गेले आहे अशी माहिती त्यांनी दिली.

पीक विम्याचे पैसे मिळत नाही, नुकसान भरपाई नाही. चुकीच्या निर्यात धोरणामुळे कांदा, संत्रा, केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतमालाला योग्य भाव नाही, दुधालाही भाव नाही. महागाईमुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढलेला आहे, जाहीर केलेल्या एमएसपीत तेही भागत नाही. जानेवारी ते मे या पाच महिन्यात १०७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. बेरोजगारी ११ टक्क्यांच्या वर गेलेली आहे. राज्यात आलेले औद्योगिक प्रकल्प गुजरातला गेले तरी सुद्धा मूग गिळून गप्प बसणारे सत्ताधारी आहेत.  २.५ लाख सरकारी पदे रिकामी आहेत. गरीब कष्ट करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर फुटीला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रातला युवक अत्यंत तणावग्रस्त परिस्थितीत आहे. नवीन एमआयडीसी स्थापन झालेली नाही. कुठेही इन्व्हेस्टमेंट दिसत नाही. महाराष्ट्रात ४०-४५ लाख युवक बेरोजगार आहेत. कोट्यावधी रुपये खर्चून ४२४ महरोजगर मेळावे घेण्यात आले. त्यात सरासरी फक्त ६० जणांना रोजगार मिळाले. एफडीआय इन्व्हेस्टमेंट १५ टक्क्यांनी कमी झाली आहे. हे विदारक सत्य आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

भ्रष्टाचारात प्रचंड वाढ झाली आहे. सत्ताधारी आणि अधिकारी म्हणून याच खतपाणी घालत आहेत. ‘भ्रष्टाचारांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या २५ भ्रष्टाचारी नेत्यांनी भाजपात प्रवेश केला, त्यापैकी २३ लोकांवर कोणतीही कारवाई झाली नाही. अनेक घोटाळ्यांची लिस्ट मी विधानसभेत मांडली. मग त्या डांबर घोटाळा होता, मेघा इंजीनियरिंग कंपनीचा घोटाळा, सातारा जिल्ह्यातील हॉस्पिटल घोटाळा, कारागृह घोटाळा, देवस्थान घोटाळा यादी मोठी आहे. त्यावर कुठलही कारवाई करण्याची मानसिकता सरकारची दिसत नाही. गुन्ह्यांच्याबाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर गेले आहे. महिला, बालक यांच्यावरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे ही वस्तुस्थिती त्यांनी मांडत त्यांनी महायुतीचे काळे कारनामे ही पुस्तिका प्रकाशित केली.

माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र उपक्रम

आजच्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हा उपक्रम जाहीर केला. या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय रील स्पर्धा घेतल्या जाणार, राज्यस्तरीय पोस्टर मेकींग, जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातील. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्राच्या संकल्पना जाणून घेतल्या जातील तसेच या संकल्पना आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केल्या जातील. ‘माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र’ या अभियानाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्याचा आमचा प्रयास राहील असे जयंत पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img