मुंबई
मध्य रेल्वेने प्रवास (Central Railway) करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता दादर (Dadar) स्थानकातून रोज 10 लोकल फेऱ्या सुरु होत आहेत. तसेच, परळ (Pearl) स्थानकातून अतिरिक्त 24 फेऱ्या सुरू होणार आहेत. सीएसएमटीहून (CSMT) सुटणाऱ्या लोकलमध्ये दादर येथे प्रवाशांना चढता येत नसल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रोज दादर येथे प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नसल्याच्या तक्रारी वारंवार प्रवासी रेल्वे प्रशासनाकडे करतात. त्याचीच दखल घेत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून सुटणाऱ्या लोकलमध्ये दादर स्थानकात प्रवेश करता येत नसल्याच्या तक्रारीची दखल घेत मध्य रेल्वेने मुंबई उपनगरी रेल्वेच्या नव्या वेळापत्रकाची आखणी केली आहे. दादर स्थानकातून 10 लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तसेच, परळ स्थानकातून अतिरिक्त 24 फेऱ्या सुरू होणार आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नवे वेळापत्रक लागू होणार आहे. दादर येथील 11 क्रमांकाच्या नव्या फलाटाचा अधिक वापर व्हावा, यासाठी सीएसएमटीहून सुटणाऱ्या 10 फेऱ्या दादर स्थानकातून चालवण्यात येणार आहेत. यात 5 अप आणि 5 डाउन लोकलचा समावेश आहे.
या नव्या वेळापत्रकानुसार, सीएसएमटी ते ठाणे अशा 6 लोकल फेऱ्या कल्याणपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.दादरमधून सुटणाऱ्या 24 धीम्या लोकल आता परळमधून सुटणार आहे. त्याऐवजी दादरमधून 10 जलद लोकल सुटणार आहेत.या नवीन वेळापत्रकानुसार हार्बर लाइनच्या लोकल फेऱ्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.