मुंबई
राष्ट्रीय स्वंयसेवक (RSS) संघाशी संबंधित असलेल्या साप्ताहिक विवेकने अजित पवारांशी (Ajit Pawar) केलेल्या युतीवरून लेख लिहिला. यावरून विरोधकांनी भाजपाला (BJP) टिकेचे लक्ष्य करत विधाने केली. विरोधकांच्या या टिकेला भाजपा गटनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
दरेकर म्हणाले की, सुप्रिया सुळे किंवा जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या घरात काय चाललेय, आपल्या पायाखाली काय जळतेय याची काळजी करावी. दुसऱ्याच्या घरात डोकावण्याची गरज वाटत नाही. भाजपाचा कार्यकर्ता हा अत्यंत परिपक्वतेने घडला आहे.अनेक संकटे, चढउतार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पाहिलेत. म्हणूनच केंद्रात तिसऱ्यांदा भाजपाला मोठ्या संख्येने यश मिळताना दिसतेय. संघांचे विवेक साप्ताहिक भाजपाला मार्गदर्शक, दिशादर्शक आहे. त्यांच्या सूचना स्वागतार्ह मानून ताकदीने भाजपाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करू. तसेच अजित पवार यांच्यावर आरोप झालेत. आरोपांची सिद्धता झाली नव्हती हे अनेकदा समोर आलेय. त्यामुळे पुन्हा शिळ्या कडीला उत आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये.
दरेकर म्हणाले की, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते की, सह्याद्रीवरील बैठकीला विरोधी पक्षाचे नेते जाणीवपूर्वक उपस्थित नव्हते. त्यांच्या या वक्तव्यावर आज शरद पवार यांच्या भूमिकेतून शिक्कामोर्तब झालेय. ती बैठकच सुसंवादासाठी होती. ती बैठक सर्व पक्षांनी एकत्रित येऊन मराठा आरक्षण, सगेसोयरे व ओबीसीच्या हिताचे आरक्षणाचे रक्षण या विषयासाठी होती. तोच विषय असेल तर तिथे येऊनही संवाद साधला जाऊ शकत होता. परंतु प्रत्येक गोष्टीत राजकारण केले पाहिजे असे नाही. म्हणून व्यापक भुमिका घेऊन मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत जे काय म्हणणे आहे ते पवार सांगू शकले असते. सरकारची भुमिका व्यापक आणि स्पष्ट आहे. सरकारने अनेकदा सांगितलेय मराठा आरक्षण आम्ही दिलेय, ते कायद्याच्या चौकटीत टिकवलेय, टिकवू. सगेसोयरेबाबत संदर्भ तपासतोय, प्रक्रिया सुरू आहे. आलेल्या हरकतींच्याबाबतही माहिती घेतोय. ओबीसीच्या आरक्षणाला जराही धक्का लागणार नाही यापेक्षा स्पष्ट भुमिका सरकारने कोणती घ्यायला पाहिजे. सरकारची तर स्पष्ट भुमिका आहे परंतु तुमचीच भुमिका स्पष्ट नाही. त्यामुळेच बैठकीला येण्यापासून टाळले, असा आरोपही दरेकरांनी पवारांवर केला. तसेच या विषयात सर्वांनी सहभागी व्हावे आणि जो महाराष्ट्र अशांततेच्या उंबरठ्यावर आहे तो शांत करण्यासाठी पुरोगामीत्वाचे नेहमीच समर्थन करणाऱ्या शरद पवारांनी पुढाकार घेऊन सरकारशी समन्वय साधावा, असेही दरेकर म्हणाले.
छत्रपती शिवरायांनी ज्या वाघनखांनी अफझल खानाचा कोथळा काढला ती वाघनखे उद्या विशेष विमानाने लंडनहुन महाराष्ट्रात येणार आहेत. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, महाराष्ट्र हा इतिहास जपणारा प्रदेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास महाराष्ट्राला आहे. येथील जनतेच्या मनामनात रोज गायला जातो. अशा वेळेला जर वाघनखे महाराष्ट्रात येत असतील, ज्या वाघनखांनी इतिहास घडविला ती येत असतील तर त्याचे स्वागत आहे.
मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना दरेकर म्हणाले की, ही बातमी, चर्चा आहे. हा विषय माझ्या अखत्यारीत येत नाही. राज्यातील तिन्ही पक्षांचे नेते, आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीचे शीर्षस्थ नेतृत्व याबाबतचा निर्णय घेत असतात. त्यावर आम्ही भुमिका मांडणे उचित नाही. मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली संमतीने होतो. ते जे बोलतील त्याला निश्चितच महत्व आहे.
दरेकर पुढे म्हणाले की, अजित पवार यांनी काय खेळी करावी हा त्यांचा विषय आहे. त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे. नवाब मलिक आमच्या पक्षाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांनी काय भुमिका घ्यावी हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाची आमच्याशी युती आहे. त्यांच्या पक्षांतर्गत गोष्टी अजित पवार ठरवत असतात.
ठाकरे गटाच्या बैठकीवर बोलताना दरेकर म्हणाले की, ठाकरेंचीच तयारी दिसतेय, सगळेच पक्ष तयारीला लागलेत. राष्ट्रवादी तयारीला लागली असून त्यांचा दौरा होणार आहे. शिवसेनेच्या बैठका सुरू आहेत. आमची संवाद यात्रा सुरू होणार आहे. आम्ही थोडे झोपून आहोत. सर्वच पक्ष तयारीला लागलेत ठाकरेंची तयारी त्यापेक्षा वेगळी नाही, असा टोलाही दरेकरांनी लगावला.
२४ जुलैपासून भूमिगत मेट्रो धावणार आहे. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, मुंबई झपाट्याने बदलतेय. इन्फ्रास्ट्रक्चरल विकसित होतेय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेस्को येथे बोलताना मुंबई जगाचे आर्थिक सत्ताकेंद्र व्हावे अशी भुमिका मांडली होती. अशावेळी एक-एक गोष्टी मुंबईसाठी येत असतील तर मुंबईच्या प्रवासाच्या, वाहतुकीच्या दृष्टीने मुंबईकरांसाठी सुखकारकच आहेत. त्याचे स्वागतच व्हायला हवे.
दरेकर म्हणाले की, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाते आई आणि मुलाचे आहे. आरएसएस ही आमची मातृत्व संस्था आहे. भाजपा हा त्यांच्या अनेक उपक्रमांपैकी एक राजकीय पक्ष आहे. त्यामुळे आपल्या अपत्याला मार्गदर्शन करण्याचे, दिशा देण्याचे काम आईच्या भूमिकेतून करणे चुकीचे नसते. मुलगा कितीही ताकदवान झाला तरी आईचे प्रेम, जिव्हाळा हवाच असतो. संघाच्या बाबतीतही भाजपाचे नाते तशाच पद्धतीचे आहे आणि राहील.